Nashik Rain Update : नाशिकमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) गोदावरी नदीच्या (Godavari River) पात्रात कमालीची वाढ झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले असून पातळेश्वर मंदिर अर्धे पाण्याखाली गेले आहे. तर बाजारपेठ परिसरात पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे. भाजी विक्रेते, फळ विक्रेतांची दुकाने सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. तसेच दारणा धरण 50 टक्के भरल्याने आज दुपारी 3 वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.    हवामान खात्याने आज नाशिकसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे. पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले आहे. त्याचबरोबर, पातळेश्वर मंदिराचाही काही भाग आता पाण्याखाली गेला आहे.  

बाजारपेठ आणि व्यापाऱ्यांवर परिणाम

गोदावरी घाटालगतची बाजारपेठ देखील आता पाण्याच्या विळख्यात सापडण्याच्या मार्गावर आहे. फळ विक्रेते व भाजी विक्रेत्यांनी आपले स्टॉल उचलून सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरू लागल्याचेही वृत्त आहे. व्यापाऱ्यांनी स्वतःहून खबरदारी घेत आपला माल हलवण्यास सुरुवात केली आहे.

दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग 

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे दारणा धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून धरण 50 टक्के क्षमतेने भरले आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीन वाजता दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. दारणा पॉवर हाऊसमधून सुमारे 1100 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. सततच्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दारणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

त्र्यंबकेश्वरमध्येही मुसळधार पावसाचा जोर

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरात देखील काल संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. अवघ्या तासाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे गावातील सखल भागात पाणी साचले आणि रस्त्यांनी अक्षरशः नदीचे स्वरूप धारण केले. पावसामुळे कुशावर्त तीर्थ आणि त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. शहरातील अनेक रस्ते पूर्णतः जलमय झाले होते. पावसामुळे वाहतूकही विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. 

आणखी वाचा

पुणे, रायगड आणि नाशिकमध्ये तुफान पाऊस, रस्ते तुंबले, अनेक भागात कमरेइतकं पाणी