Nashik Rain Update : नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या पाणी पातळीमुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी साचू लागले आहे. तर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. याच दरम्यान, गोदावरी नदीच्या पात्रालगत रस्त्यावर पार्क केलेली एक कार अचानक वाढलेल्या पाण्यात अडकली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा कार तिथे पार्क करण्यात आली, तेव्हा तिथे पाणी नव्हते. मात्र अल्प वेळातच नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने ती गाडी पाण्यात अडकली. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने सध्या गाडी बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिक महापालिकेने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या भागांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. गोदावरी नदीची पाण्याची पातळी वाढत असल्याने परिसरात वाहने पार्क करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तर हवामान विभागाने नाशिकसाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, पुढील काही तास पावसाचा जोर असाच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत आणखी वाढ होऊ शकते.
भांडी बाजारात शिरले पाणी, दुकानदारांची तारांबळ
दरम्यान, गोदावरी नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. भांडी बाजार परिसरात पुराचे पाणी शिरले असून, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोदावरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने भांडी बाजार परिसरात असलेल्या अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. व्यापाऱ्यांनी तातडीने आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. अनेक दुकाने अर्धवट बंद करून सामान बाहेर काढले जात आहे. पुराच्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली आहे.
दारणा धरणातून यंदाचा पहिला विसर्ग
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे दारणा धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून धरण 50 टक्के क्षमतेने भरले आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीन वाजता दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दारणा पॉवर हाऊसमधून सुमारे 1100 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दारणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आणखी वाचा
पुणे, रायगड आणि नाशिकमध्ये तुफान पाऊस, रस्ते तुंबले, अनेक भागात कमरेइतकं पाणी