नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह अनेक भागांमध्ये धुवाधार पावसानं झोडपलं, मात्र नाशिकमध्ये ज्या ढगफुटीसदृश पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता असा पाऊस कुठेही पडला नसल्याचं समोर आलं. नाशिकमध्ये सर्वाधिक पाऊस हा इगतपुरीमध्ये झाला असून त्र्यंबकेश्वरमध्येही (Trimbakeshwar) चांगला पाऊस पडला. मात्र, सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेला अंदाज, म्हणजे 300 मिलिमीटर पाऊस मात्र कुठेही पडला नसल्याचं समोर आलं. त्यामुळे मोठी आपत्ती टळल्याचं समाधान नक्कीच आहे, .मात्र सरकार आणि हवामान खात्याचं भाकित चुकल्याचंही सत्य नाकारता येणार नाही.
मंगळवारी (7 जुलै) नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली होती. नाशिकमध्ये इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर यासह काही भागात 300 मिलिमीटर पाऊस पडणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यानी दिली होती. त्यामुळे नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये प्रशासन हाय अलर्टवर होतं. तसेच शाळांनाही सु्ट्टी जाहीर करण्यात आली होती.
नाशिकमध्ये सर्वाधिक पाऊस हा इगतपुरीमध्ये पडला आहे. इगतपुरीमध्ये 200 मिमी तर त्र्यंबकेश्वरमध्ये 125 मिमी पाऊस पडला. सुरगनामध्ये 149 मिमी पाऊस पडला. या व्यतिरिक्त बहुतांश ठिकाणी कमी पावसाची नोंद झाली आहे.
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी -
- इगतपुरी - 200
- सुरगाणा - 149
- त्र्यंबकेश्वर - 125
- सिन्नर - 74
- पेठ - 61
- दिंडोरी - 58
- पिंपळगाव बसवंत - 51.5
- सटाणा (बागलाण) - 47
- निफाड - 45.2
- कळवण - 40
- देवळा - 40
- येवला - 15
- नांदगाव - 1
दरम्यान, नाशिकमध्ये वर्तवण्यात आलेला पावसाचा अंदाज चुकल्यामुळे विरोधकांनी आता सरकारवर आरोपांचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. राम मंदिरातील दानचोरी विरोधातील काँग्रेसचं आंदोलन चिरडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीची अफवा पसरवली अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांवर निशाणा साधला. नाशिकमध्ये काळाराम मंदिराच्या बाहेर काँग्रेसनं सत्याग्रह आंदोलन केलं.
ही बातमी वाचा:
