Nashik Rain: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरासाठी 7 जुलै रोजी ढगफुटीची (Cloudburst) दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकाच दिवसात 300 मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळण्याचा अंदाज जाहीर केल्यानंतर संपूर्ण नाशिक जिल्हा प्रशासन हायअलर्टवर आले आहे. या संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीची पत्रकार परिषद घेऊन मोठे निर्णय जाहीर केले आहेत. प्रवाशांच्या आणि भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून आज रात्रीपासूनच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि सप्तशृंगी मंदिर परवापर्यंत भाविकांसाठी पूर्णपणे बंद (Trimbakeshwar Temple Closed) ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, "ढगफुटी पाऊस वॉर्निंग 7 जुलैला आहे, ती त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर दरम्यानच्या भागात आहे. नाशिकचा पेठ तालुका या भागातही हा इशारा आहे. नाशिक, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यात जास्त पाऊस होणार आहे. त्यामुळे नाशिक, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आठवडे बाजार आणि शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Nashik Rain: उद्या त्र्यंबकेश्वर अन् सप्तश्रृंगी मंदिर भाविकांसाठी बंद
शेतकऱ्यांनीही उद्या शेतीच्या कामासाठी बाहेर न पडता घरीच थांबावे. खबरदारी म्हणून काही रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. आज रात्रीपासून त्र्यंबकेश्वर देवस्थान बंद राहणार असून परवापर्यंत मंदिर बंद राहील. सप्तश्रृंगी गड येथेही 65 मिलिमीटर पाऊस होण्याचा अंदाज आहे, तिथे जरी जास्त पाऊस नसला तरी सुरक्षेचा उपाय म्हणून सप्तश्रृंगी मंदिरही बंद राहणार आहे. नद्यांचा फ्लो कायम राहील, त्यामुळे नदीपात्रात कुठे अडथळा असेल तर ते दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त भागातील पशुधनाचे गोठे स्थलांतरित करण्याच्या सूचना आहेत. ज्या गावांमध्ये दगड किंवा दरड पडण्याची शक्यता आहे, अशा गावांना आधीच सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
Nashik Rain: शाळा महाविद्यालयांना सुट्टी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पुढे म्हणाले की, पेठ, दिंडोरी, नाशिक ग्रामीण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील शाळा आणि महाविद्यालये पूर्णपणे बंद राहतील. धबधब्यांच्या ठिकाणी विशेष सुरक्षा कर्मचारी तैनात राहतील. तसेच छोटे पूल आणि साकव परिसरात कर्मचारी सतर्क राहणार आहेत. इगतपुरी भागातील रेल्वे विभागाला हवामानाच्या परिस्थितीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही दुर्घटना घडणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात आहे. गड, किल्ले आणि धबधब्यांच्या ठिकाणी नागरिकांनी अजिबात जाऊ नये. पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यांची कंट्रोल रूम तयार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
Nashik Rain: आपत्कालीन परिस्थितीमध्ये 112 आणि 108 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन
प्रशासनाला ज्या ज्या यंत्रणा लागणार आहेत, त्या सर्व आम्ही पुरवणार आहोत. आज रात्रीपासून परवापर्यंत जिल्हा अलर्टवर राहणार आहे. त्र्यंबकेश्वरमधील काही गावांचे रोड बंद ठेवणार आहोत. कमकुवत स्ट्रक्चर किंवा गोठे असतील तिथे विशेष काळजी घेतली जाईल. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये 112 आणि 108 या नंबरवर संपर्क साधावा. नाशिक शहराच्या बाबतीत महापौर आणि मनपा आयुक्त स्वतंत्र निर्णय घेतील. समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या असून वाहनचालकांनी जास्त वेगाने वाहने चालवू नयेत. ज्या महिला गरोदर आहेत आणि त्यांची पुढील दोन-तीन दिवसांत प्रसूती होणार असेल, तर त्यांना संभाव्य अडचण लक्षात घेऊन आजच दवाखान्यात दाखल होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करालाही परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यात आली असून, गरज पडली तर त्यांचीही मदत घेतली जाईल," असे देखील त्यांनी म्हटले.
Nashik Rain: दुगारवाडी, हरिहर गड आणि पहिने पर्यटकांसाठी बंद!
दुसरीकडे, वनविभागानेही (Forest Department) मोठी पावले उचलली आहेत. नाशिकमधील उद्याच्या हायअलर्टच्या पार्श्वभूमीवर वनपरीक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी अधिकृत आदेश काढले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रसिद्ध पर्यटन स्थळे जसे की दुगारवाडी धबधबा (Dugarwadi Waterfall), हरिहर गड (Harihar Fort) आणि पहिने (Pahine) पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. प्रशासनाने नागरिकांना अत्यंत गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि पूर परिस्थितीमध्ये प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
आणखी वाचा
