Nashik Pune Railway: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे (Nashik Pune High Speed Railway) प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा या मागणीसाठी आज, 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे (Kranti Din) औचित्य साधून उत्तर ठिकठिकाणी तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सिन्नर तालुक्यातील गोंदे फाटा येथील समृद्धी महामार्गाजवळ   (Samruddhi Mahamarg) आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलिसांनी आक्रमक आंदोलकांना रोखण्यासाठी बळाचा वापर करत सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेतले, यानंतर आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.   

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुमारे 16 हजार कोटी रुपयांचा आहे. मात्र, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील जागतिक दर्जाच्या 'जीएमआरटी' (GMRT) दुर्बिणीला धोका निर्माण होत असल्याचे कारण देत रेल्वे मंत्रालयाने मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला. पुणे–चाकण–राजगुरुनगर–मंचर–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर–नाशिक असा मूळ मार्ग रद्द करून रेल्वे मंत्रालयाने नाशिक-शिर्डी-पुणतांबा आणि अहिल्यानगर-चाकण अशा पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण केले आहे. या निर्णयामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर आणि सिन्नर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

Nashik Pune Railway: खासदार अमोल कोल्हे, बाळासाहेब थोरात अन् सत्यजीत तांबेंचे नेतृत्व

मूळ मार्गच कायम राहावा या मागणीसाठी आज चाकणपासून सिन्नरपर्यंत रस्ते रोखण्यात आले. जुन्नर तालुक्यात खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe), संगमनेर हिवरगाव पावसा टोल नाक्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), तर सिन्नरमधील गोंदे फाट्यावर आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वात रस्ता रोको करण्यात आला.

Satyajeet Tambe and Girish Mahajan: गिरीश महाजन यांचा फोन अन् सरकारचे आश्वासन

आंदोलनादरम्यान मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आमदार सत्यजीत तांबे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि सत्यजीत तांबे यांच्यातही चर्चा झाली होती. प्रकल्पाच्या तांत्रिक अभ्यासासाठी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असून त्यात रेल्वे बोर्ड व विभागीय आयुक्तांचा समावेश आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले की, "या समितीचा आणि जनसुनावणीचा निर्णय पुढील सात दिवसांत घेतला जाईल. या समितीला कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही." मात्र, आंदोलकांनी मूळ मार्ग मंजूर होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.

Satyajeet Tambe: सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात

सत्यजीत तांबे समर्थकांसह समृद्धी महामार्गावर आंदोलन करण्यासाठी आगेकूच करत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये प्रचंड झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अखेर बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी सत्यजीत तांबे यांना ताब्यात घेतले. यानंतर संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आणखी वाचा 

Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा