(Source: ECI | ABP NEWS)
Nashik Politics : सुनील बागुल, मामा राजवाडेंपाठोपाठ काँग्रेसचेही बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; नाशिकमधील बड्या नेत्याचा दाव्याने भुवया उंचावल्या
Nashik Politics : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग पाहायला मिळत आहे.

Nashik Politics : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये येत्या रविवारी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जंबो प्रवेश सोहळा पार पडणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी देखील भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात भाजपात अनेक मोठमोठे प्रवेश होणार असल्याचा दावा भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी केला आहे. रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटले आहे की, रविवारी रावसाहेब थोरात सभागृहात सुनील बागुल, मामा राजवाडे, गुलाब भोये यांचे प्रवेश भाजपमध्ये होणार आहे. तसेच राहुल दिवे यांचा देखील प्रवेश होण्याची शक्यता आहे. अजून देखील काही शिवसेना ठाकरे गटाचे, काँग्रेसचे नेते आणि पदाधिकारी भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. ते आमच्या संपर्कात आहेत. लवकरच आपल्याला समजेल, असा दावा त्यांनी यावेळी केलाय.
काँग्रेससह इतर पक्षाचे नेते भाजपच्या संपर्कात
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. याबाबत विचारले असता सुनील केदार म्हणाले की, फक्त काँग्रेसचेच नव्हे तर इतर सर्व पक्षाचे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यादृष्टीने आमची बोलणी सुरू आहे. रविवारचे प्रवेश झाल्यानंतर अजूनही मोठमोठे प्रवेश येत्या आठ-पंधरा दिवसात होणार आहेत, असे त्यांनी म्हटले.
आगामी काळातील प्रवेश नाशिकमध्येच होणार
यंदा पक्ष प्रवेश नाशिकमध्येच का होत आहेत? असं विचारले असता सुनील केदार म्हणाले की, प्रवेश हे स्थानिक ठिकाणी व्हावे, अशी आमची देखील इच्छा होती आणि ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांची देखील इच्छा होती. त्यामुळे आम्ही नाशिकमध्ये प्रवेश घेत आहोत. आगामी काळात देखील पक्ष प्रवेश नाशिकमध्येच होतील. अनेक नेते भाजपमध्ये सहभागी होतील.
काँग्रेसचं अस्तित्वच उरलेले नाही
नाशिक महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपने 100 प्लसचा नारा दिला आहे. यावर काँग्रेसने टीकास्त्र लागले आहे. भाजपचा शंभर पारचा दिला जाणारा नारा फोल ठरेल, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. याबाबत विचारले असता सुनील केदार म्हणाले की, काँग्रेसचा हा भ्रमनिरास आहे. काँग्रेस राहिलेलीच कुठे आहे? देशात, राज्यात आणि शहरात देखील काँग्रेसचे अस्तित्वच उरलेले नाही. त्यामुळे काँग्रेसकडून असे वक्तव्य होत आहे. वैफल्यग्रस्त झाल्याने काँग्रेसचे नेते अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत, असे म्हणत त्यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका केलीय.
आणखी वाचा
























