Manikrao Kokate Vijay Kokate: शासकीय सदनिका लाटण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केल्याच्या 1995 सालच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मोठा धक्का बसला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik Court) या प्रकरणात सुनावलेली दोन वर्षांची कारावासाची शिक्षा कायम ठेवल्यानंतर आता पोलिसांची कारवाई वेगाने सुरू झाली आहे. मात्र माणिकराव कोकाटे सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, नाशिक पोलिसांनी (Nashik Police) आता त्यांचे बंधू विजय कोकाटे (Vijay Kokate) यांच्याकडे मोर्चा वळवला आहे.
नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र माणिकराव कोकाटे रुग्णालयात दाखल असल्याने त्यांच्या अटकेबाबत सध्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
Vijay Kokate: विजय कोकाटेंना हुडकून काढण्यासाठी सर्च ऑपरेशन
दुसरीकडे, विजय कोकाटे हे सध्या कुठे आहेत, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसल्याने नाशिक पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. विजय कोकाटेंनाही या प्रकरणात सरकारची फसवणूक करत शासकीय सदनिका लाटल्याबद्दल दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यांच्यावरही अटक वॉरंट लागू आहे. विजय कोकाटेंना अटक करण्यासाठी पोलिसांचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. आता विजय कोकाटे यांना पोलीस नेमकं कधी ताब्यात घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
manikrao kokate: नेमकं काय आहे प्रकरण?
1995 ते 1997 या कालावधीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी शासनाकडून मिळणाऱ्या शासकीय सदनिका घेतल्या होत्या. त्या वेळी त्यांनी आपले उत्पन्न कमी असल्याचे आणि स्वतःकडे अन्य कोणतेही घर नसल्याची माहिती शासनाला दिली होती. या आधारे त्यांना शासनामार्फत सदनिका मंजूर करण्यात आल्या.
मात्र या प्रक्रियेत कागदपत्रांमध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप पुढे आला. या संदर्भात तत्कालीन अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवली होती. 1995 साली माणिकराव कोकाटे यांच्यावर कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेच्या आधारे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 1997 पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. अखेर न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांना दोषी ठरवत प्रत्येकी दोन वर्षांची कारावासाची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
आणखी वाचा