Nashik News: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्ती, रुंदीकरण आणि उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. या विकासकामांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरात सर्व खासगी बस तसेच जड आणि अवजड वाहनांसाठी ‘नो एन्ट्री’ लागू करण्यात आली आहे.

वाहतूक पोलीस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी या संदर्भातील अधिसूचनेला पुढील तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार शहरातील सर्व खासगी बसथांबे, पिक-अप आणि ड्रॉप पॉइंट्स तसेच पार्किंग स्थळे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, तपोवन येथील सिटीलिंक बस टर्मिनलवरून प्रवाशांची वाहतूक पूर्ववत सुरू राहणार आहे.

Nashik News: ग्रेड सेप्रेटरमुळे मार्गांमध्ये बदल

द्वारका सिग्नल ते सारडा सर्कल आणि काठे गल्लीपर्यंत ‘ग्रेड सेप्रेटर’चे काम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. कार आणि दुचाकी वाहने मुंबई नाका व टाकळीमार्गे वळविण्यात आली आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला खासगी बसथांबे रद्द करण्याबाबत आणि शहरात प्रवेशबंदी लागू करण्याबाबत अधिसूचना काढण्यात आली होती. आता त्यात वाढ करून 31 मे 2026 पर्यंत ही अधिसूचना लागू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शहरातील 29 रस्त्यांवरील दुरुस्ती व खोदकामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने अधिसूचनेत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित वाहनमालक आणि चालकांनी या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त किरिथिका सी. एम. यांनी दिली.

Nashik News: आदेशातील प्रमुख मुद्दे

- शहरात 29 रस्त्यांची तसेच 5 उड्डाणपुलांची विकासकामे, दुरुस्ती आणि रुंदीकरण सुरू. 

- खासगी ट्रॅव्हल्समुळे द्वारका, मुंबई नाका, रुची हॉटेल परिसर, महामार्ग बसस्थानक, ठक्कर बाजार, ट्रॅक्टर हाऊस, तिगरानिया रोड, कन्नमवार पूल आणि रामकुंड परिसरात वाहतूक कोंडी. 

- जड व अवजड वाहने आणि खासगी बस यांना सकाळी 8 ते रात्री 10 या वेळेत शहरात प्रवेशबंदी; सकाळी 8 पूर्वी वाहने शहराबाहेर मार्गस्थ होणे बंधनकारक. 

- सर्व खासगी बसचे थांबे, पिक-अप-ड्रॉप पॉइंट्स आणि पार्किंग स्थळे रद्द.

- तपोवन सिटीलिंक बस टर्मिनल येथेच खासगी बस प्रवासी उतरवणे-चढवणे व पार्किंगची व्यवस्था.

- 28 फेब्रुवारी ते 31 मे 2026 या कालावधीत अधिसूचना लागू; आवश्यकतेनुसार मुदतवाढ किंवा बदल शक्य.

आणखी वाचा 

कांद्याच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघेना, शेतकरी संघटना आक्रमक, 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी