Nashik News: एसटी महामंडळाच्या (MSRTC) नाशिक आणि अमरावती विभागांतर्गत सुरू असलेल्या ढिसाळ, मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत परिवहन मंत्रालयाने (Ministry of Transport) आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. प्रवाशांची लूट आणि महामंडळाचे अतोनात आर्थिक नुकसान करणाऱ्या तब्बल 11 बड्या अधिकाऱ्यांना तडकाफाडकी निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये वर्ग 1 (Class 1) श्रेणीतील 3 उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह वर्ग 2 मधील 8 अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

Nashik News: निलंबित करण्यात आलेल्या 11 अधिकाऱ्यांची नावे

कामात गंभीर हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत महामंडळाने खालील अधिकाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड चालवली आहे. 

1. श्रावण सोनवणे (प्रादेशिक अभियंता)2. सचिन क्षीरसागर (नाशिक विभाग नियंत्रक)3. पंकज महाजन (यंत्र अभियंता)4. किरण भोसले (विभागीय वाहतूक अधिकारी)5. सौरभ देवरे (आगार व्यवस्थापक, पंचवटी)6. नीलिमा विसपुते (लेखा अधिकारी)7. संजय गायधनी (विभागीय लेखा अधिकारी)8. अमोल वाघ (विभागीय भंडार अधिकारी)9. अश्विनी चव्हाण (विभागीय कर्मवर्ग अधिकारी)10. चैताली भुसारे (विभागीय अभियंता)11. प्रणव अहिरे (आगार व्यवस्थापक)

Nashik News: अकार्यक्षमता अन् चुकीच्या कामांना संरक्षण 

या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशी घालणे आणि वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले प्रादेशिक अभियंता श्रावण सोनवणे यांच्या अकार्यक्षमतेमुळे महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसल्याचे निष्पन्न झाले आहे.

गेल्या काही काळात एसटी महामंडळाने प्रवासी भाड्यात मोठी वाढ केली होती. उत्पन्न वाढणे अपेक्षित असतानाही, नाशिक विभागातील उत्पन्न वाढण्याऐवजी गेल्या दोन हंगामात कमालीचे घटले होते. हा संशयास्पद विरोधाभास उघडकीस आणण्यासाठी 10 जून रोजी महामंडळाचे व्यवस्थापक तथा नियंत्रण अधिकारी वीरेंद्र कदम यांनी सांख्यिकी व नियोजन अधिकाऱ्यांसमवेत  इगतपुरी आणि नाशिक आगारात अचानक गुप्त भेट दिली होती.

Nashik News: तपासणीत 'तोट्यात ढकलण्याचा कट' उघड

या गुप्त तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक केलेला निष्काळजीपणा समोर आला. वाहनांचे मूळ रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणे, चालकांच्या आणि वाहकांच्या हजेरीवर कोणतेही नियंत्रण नसणे, नादुरुस्त वाहने वेळेत दुरुस्त न करणे, ज्यामुळे फेऱ्या रद्द झाल्या, प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे,  विभागाला जाणीवपूर्वक तोट्यात ढकलण्याचा एक प्रकारे गंभीर कटच या अधिकाऱ्यांनी रचल्याचा ठपका नियंत्रण समितीच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.

Nashik News: कामकाजावर परिणाम, पण कामचुकारांना मोठा इशारा

एकाच वेळी 11 प्रमुख अधिकारी निलंबित झाल्याने नाशिक विभागीय कार्यालयाचे दैनंदिन कामकाज तात्पुरते विस्कळीत झाले असले, तरीही "कामचुकारपणा किंवा भ्रष्टाचार केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही," हा अतिशय कडक संदेश महामंडळाने या कारवाईच्या माध्यमातून तळागाळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवला आहे. पुढील चौकशी होईपर्यंत या सर्व अधिकाऱ्यांचे निलंबन कायम राहणार आहे. 

Amravati News: अमरावती विभागातील आगार व्यवस्थापक निलंबित

दरम्यान, अमरावती विभागातील परतवाडा आगाराचे व्यवस्थापक जीवन वानखेडे यांच्यावर प्रादेशिक व्यवस्थापकांनी निलंबनाची कठोर कारवाई केली आहे. कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करून कामकाजात गंभीर हलगर्जीपणा केल्याचे त्यांना रंगेहात पकडण्यात आले. प्राथमिक चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, विभागीय चौकशीत दोषी आढळल्यास त्यांना एसटीच्या सेवेतून थेट बडतर्फ करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतेच एसटीचे उत्पन्न बुडवणारे आणि शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे मानले जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

वर्षभरापूर्वी विवाह केलेल्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीकडून आयुष्याचा शेवट, 'त्या' पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू; मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा, मालेगावातील घटनेनं खळबळ