Nashik News: संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या अनेक सर्वसामान्य आणि अनोळखी लोकांच्या मदतीला धावून जाणारा नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या मनमाडचा (Manmad) विशाल सुभाष राऊत याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. इलेक्ट्रिशियन (Electrician) म्हणून काम करणाऱ्या विशालने आपल्या मदतकार्यामुळे दीडशेपेक्षा अधिक जणांना संकटाच्या काळात आधार दिला होता. मात्र, इतरांसाठी देवदूत ठरलेल्या विशालवरच काळाने घाला घातला.
मालेगावमधील (Malegaon) मोती कॉर्नर येथे शनिवारी दुपारी सुमारे अडीच वाजता काम सुरू असताना इमारतीवरून पडल्याने विशालचा जागीच मृत्यू झाला. दिलखुलास, मनमोकळा आणि सामाजिक जाणीव जपणारा विशाल अशा प्रकारे अचानक जगाचा निरोप घेऊन गेल्याने त्याच्या मित्रपरिवारासह मनमाडकरांना मोठा धक्का बसला आहे.
Nashik News: रस्त्यावर अपघात दिसला की मदतीला धावायचा
विवेकानंदनगर भागात राहणाऱ्या विशाल राऊतचा इलेक्ट्रिकलचा व्यवसाय होता. कामानिमित्त त्याला मनमाडसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जावे लागत होते. मात्र, कामाच्या व्यापातही त्याने समाजाप्रती असलेली आस्था कधीच सोडली नाही. आई-वडिलांचे संस्कार आणि जवळच्या व्यक्तीला योग्य वेळी मदत न मिळाल्याने उपचारासाठी झालेली ससेहोलपट विशालने जवळून पाहिली होती. यातूनच त्याच्या मनात रस्त्यावर अपघातग्रस्तांना मदत करण्याचा विचार रुजला. यानंतर चांदवड, येवला किंवा इतर ठिकाणी कामासाठी स्वतःच्या चारचाकी वाहनातून जात असताना रस्त्यावर अपघात झालेला दिसला की विशाल आपली गाडी थांबवायचा आणि तातडीने मदतीला धावायचा.
Nashik News: स्वतःच्या गाडीतून जखमींना रुग्णालयात न्यायचा
रस्त्यावर अपघात झालेला दिसल्यानंतर विशाल जखमी व्यक्तीला स्वतःच्या वाहनातून सरकारी किंवा खासगी रुग्णालयात घेऊन जायचा. केवळ रुग्णाला रुग्णालयात दाखल करून तो थांबत नसे. जखमीची विचारपूस करून त्याला धीर द्यायचा. गरज पडल्यास त्याच्या नातेवाइकांना फोन करून बोलवायचा आणि नातेवाईक येईपर्यंत स्वतः रुग्णाजवळ थांबायचा. विशालने अशा प्रकारे कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न करता मदतीचं एक अघोषित केंद्रच उभं केलं होतं. त्यामुळे संकटात सापडलेल्या अनेकांसाठी तो खऱ्या अर्थाने देवदूत ठरला.
Nashik News: दीडशेपेक्षा अधिक जणांना मदत
विशालने आपल्या मदतकार्यातून दीडशेपेक्षा अधिक जणांना वेळी-अवेळी मदत केल्याचे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले. विशेषतः रस्ते अपघातांमध्ये जखमी झालेल्या अनेकांना त्याने वेळेत रुग्णालयात पोहोचवलं आणि त्यांच्या उपचारासाठी मदतीचा हात दिला. दुसऱ्यांच्या संकटात धावून जाणाऱ्या विशालचा अचानक अपघात झाला. मात्र, यावेळी त्याला वाचवण्याची संधी कोणालाही मिळू शकली नाही. मालेगाव येथे काम सुरू असताना इमारतीवरून पडल्याने 46 वर्षीय विशालचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या अचानक जाण्याने मनमाडवर शोककळा पसरली असून, समाजमन हादरून गेले आहे. विशालच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन बहिणी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या विशालच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
