Nashik News : मोठी बातमी : नाशिकमध्ये डीजेच्या दणदणाटाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय, मोठ्या आवाजाने नाका-तोंडातून रक्तस्त्राव!
Nashik News : रविवारी नाशिकच्या फुले नगर परिसरात डीजे लावण्यात आला होता. या डीजेच्या दणदणाटाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Nashik News : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 134 वी जयंती (Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2025) आहे. यानिमित्ताने देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. त्यातच आता नाशिकमधून (Nashik News) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये डीजेच्या (DJ) दणदणाटाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नितीन फकिरा रणशिंगे (23) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 13) नाशिकच्या फुले नगर परिसरात डीजे लावण्यात आला होता. नितीन फकिरा रणशिंगे हा तरुण परिसरात आला असता डीजेच्या दणदणाटाने त्याच्या नाका तोंडातून रक्तश्राव झाला.
डीजेच्या दणदणाटाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय
यानंतर नितीन फकिरा रणशिंगे यास तातडीने उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे. डीजेच्या दणदणाटाने तरुणाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयताला इतर काही आजार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण काय? याबाबत संभ्रम आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
धावत्या दुचाकीवर झाड कोसळले; आईचा मृत्यू, मुलगा जखमी
दरम्यान, रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीवर झाडाचा काही भाग कोसळून आई ठार तर मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना गंगापूररोडवरील सोमेश्वर बसस्टॉपजवळ रविवारी घडली. शहरातील रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांवर झाड कोसळून अनेक नागरिकांनी जीव गमावला आहे. त्यात यंत्रणेने लवकरच पावसाळापूर्व कामे व झाडांची छाटणी केली असती तर ही घटना टाळता आली असती, असा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. अलका अनिल सोनवणे (55, रा. दशरथ पाटील यांच्या घराजवळ, शिवाजीनगर) असे मृत मातेचे नाव आहे तर दीपक अनिल सोनवणे (36) हा गंभीररित्या जखमी झाला आहे. या घटनेने सातपूरच्या शिवाजीनगर भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. दीपक व अलका हे रविवारी सकाळी नऊ वाजता दुचाकीवरून गंगापूर गावातून शिवाजीनगरकडे मार्गस्थ होत होते. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडाचा टणक भाग व फांद्या क्षणार्धात कोसळल्या. अर्धवट तुटलेले हे झाड सोनवणे यांच्या वाहनावर कोसळले. या घटनेत अलका यांच्या डोक्यास जबर दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तर त्यांचा मुलगा दीपक यालाही गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आणखी वाचा





















