Nashik News : सांगण्यास शब्द नव्हते, तरीही कृतीतून मानवतेचा धर्म पार पाडणाऱ्या एका मूकबधिर महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नाशिक जिल्ह्याच्या (Nashik News) बागलाण (Baglan) तालुक्यातील ठेंगोडा येथे घडली. सविता केदा पवार उर्फ सोनाली (32, रा. नवेगाव) असे या धाडसी महिलेचे नाव आहे. सविताने दहा वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचवत स्वतःचे प्राण गमावले, आणि तिच्या या त्यागाने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी ठेंगोडा गावात एक दहा वर्षांची बालिका घराशेजारी खेळत असताना विद्युत तारेच्या संपर्कात आली. शेजारी असलेल्या सविता पवार यांच्या नजरेस हा प्रसंग पडला. स्वतः मूकबधिर असतानाही, सविताने क्षणाचाही विलंब न करता जीव धोक्यात घालून बालिकेला विजेच्या विळख्यातून बाहेर काढले. चिमुकलीचा जीव वाचला, मात्र सविताला विजेचा जोरदार धक्का बसून जागीच मृत्यू झाला.

मातृत्व गमावले, पण मानवता जिंकली

सविताच्या या त्यागामुळे तिची दोन लहान मुलं आईच्या मायेपासून कायमची वंचित झाली आहेत. काही दिवसांपूर्वीच ती माहेरी, ठेंगोडा येथे आई-वडिलांना भेटण्यासाठी आली होती. तिथेच हे दुर्दैवी आणि हृदयाला चटका लावणारी घटना घडली. सविताच्या पाठीमागे पती, दोन चिमुरडी मुलं, सासू-सासरे असा परिवार आहे. या प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेने गावात आणि संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nashik News : सिडको भागात मुलाची आत्महत्या

दरम्यान, इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सिडकोतील सावतानगर परिसरात घडली. प्रसाद सुधाकर बाविस्कर (वय 13, रा. सावतानगर, सिडको) असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी प्रसादचे आई-वडील घराबाहेर गेले होते. घरात त्याची मोठी बहीण होती. त्याचवेळी प्रसादने बेडरूममध्ये दोरीच्या सहाव्याने गळफास घेतला. काही वेळानंतर हा प्रकार उघडकीस आला, तेव्हा कुटुंबीयांना धक्का बसला. तातडीने त्याला खाली उतरवून मदत करण्याचा प्रयत्न झाला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. प्रसादचे वडील हे इलेक्ट्रिशियन असून, दोन बहिणींच्या पाठीवरील एकुलता मुलगा गमावल्याने बाविस्कर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

आणखी वाचा 

Nashik Crime News: पुण्यात मैत्रिणीशी समलिंगी विवाह, आईवडिलांच्या दबावामुळे नाशिकच्या तरुणाशीही लग्न, बाथरुममधील व्हिडिओ कॉल अन् अश्लील चॅट...