Nashik News : ऐन पावसाळ्यात नाशिककरांवर जलसंकट, उद्या संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद, नेमकं कारण काय?
Nashik News : ऐन पावसाळ्यात नाशिककरांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. शनिवारी दि. 21 जून रोजी संपूर्ण दिवसभर शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Nashik News : ऐन पावसाळ्यात नाशिककरांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे. शनिवारी दि. 21 जून रोजी संपूर्ण दिवसभर शहराचा पाणीपुरवठा बंद (Water Cut) राहणार आहे. शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये नवीन व्हॉल्व्ह बसवण्याचे तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेने (Nashik NMC) केले आहे.
महानगरपालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये नवीन व्हॉल्व्ह बसवण्याची तसेच इतर देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत आहेत. या कारणास्तव, शनिवार 21 जून रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, रविवारी 22 जून रोजी सकाळच्या सत्रात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
या कामांमुळे शटडाऊन
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत महानगरपालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये आणि बुस्टर पंपिंग स्टेशनमध्ये विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. या अंतर्गत स्मार्ट सिटी कंपनीकडून नवीन व्हॉल्व्ह आणि फ्लोमीटर बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामांसाठी पाणीपुरवठा थांबवण्याची (शटडाऊन) आवश्यकता निर्माण झाली आहे. ही कामे वेळेत आणि सुरळीत पार पडावीत यासाठी शनिवार, 21 जून रोजी दिवसभर शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, रविवारी सकाळच्या सत्रात पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येणार असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
दरम्यान, पावसाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रे आणि जलकुंभांवर स्काडा प्रणाली बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे. या पार्श्वभूमीवर पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र, गंगापूर धरण पंपिंग स्टेशन तसेच बसस्थानक परिसरातील विविध प्रतिबंधात्मक देखभाल कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग
दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून शुक्रवारी (दि. 19) सकाळी सहा वाजेपासून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. सकाळी 500 क्युसेक वेगाने सुरू झालेला विसर्ग 9 वाजेपासून 1 हजार क्युसेक करण्यात आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात धरणांच्या पाणी पातळीत साधारणपणे 15 टक्के वाढ झाली आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65 टक्क्यांवर गेला असून गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच धरणातील पाणीसाठा जून महिन्यात वाढला आहे.
आणखी वाचा























