Nashik News: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, या म्हणीचा प्रत्यय नाशिकच्या (Nashik) चांदवडमध्ये (Chandwad) आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 75 वर्षीय चंद्रभागा धुळाजी व्हरकटे या आजींना अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले आहे. 29 ऑगस्टपासून बेपत्ता असलेल्या चंद्रभागा आजी बसस्थानकाजवळील एका उघड्या विहिरीत पडल्या होत्या. तब्बल दोन दिवस अन्न-पाण्याविना काळोख्या विहिरीत अडकूनही त्यांनी मृत्यूशी झुंज देत स्वतःचा जीव वाचवला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 75 वर्षीय चंद्रभागा धुळाजी व्हरकटे या 29 ऑगस्ट रोजी मुलाकडे जाते, असे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू असतानाच त्या बसस्थानकाजवळील उघड्या विहिरीत पडल्याचे उघड झाले.
Nashik News: अन्न-पाण्याविना दोन दिवस विहिरीत अडकून मृत्यूशी झुंज
विहिरीत पडल्यानंतर चंद्रभागा आजींनी धैर्य न सोडता मोटारीच्या पाईपला आणि दोरीला धरून ठेवले. अंधाऱ्या विहिरीत दोन दिवस अन्न-पाण्याविना अडकूनही त्यांनी कशीबशी आपली पकड कायम ठेवत जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. दोन दिवसांच्या या संघर्षात आजींनी अपार धैर्य दाखवले. दरम्यान, स्थानिक युवक गणेश पारवे यांच्या नजरेस विहिरीतील हे दृश्य पडले. त्यांनी तातडीने इतर नागरिकांना माहिती दिल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक युवक, चांदवड पोलीस आणि नगरपरिषदेचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
Nashik News: जीवाची पर्वा न करता युवक उतरले विहिरीत
चंद्रभागा आजींना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक युवकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उतरून आजींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर खाटेच्या सहाय्याने त्यांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. दोन दिवसांच्या संघर्षानंतर आजींची सुखरूप सुटका होताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. चंद्रभागा आजींना तातडीने पुढील उपचारांसाठी पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Nashik News: आजींना अखेर मिळाले जीवनदान
चंद्रभागा आजी या विहिरीत नेमक्या कशा पडल्या, याचा तपास आता चांदवड पोलीस करत आहेत. दरम्यान, संबंधित उघड्या विहिरीत यापूर्वीही अपघात झाल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या विहिरीभोवती सुरक्षा जाळी आणि संरक्षक कठडे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दोन दिवस मृत्यूशी झुंज देत अंधाऱ्या विहिरीत अडकून राहिलेल्या 75 वर्षीय चंद्रभागा आजींच्या धैर्याने आणि स्थानिक युवकांच्या तत्परतेने अखेर त्यांना जीवनदान मिळाले आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
