Nashik News : नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये (Kalwan) मोकाट जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचाच प्रत्यय सोमवारी आला. 80 वर्षांच्या वृद्धावर मोकाट गायींनी (Cow) हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळवण शहरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वृद्धाला जीव गमवावा लागला आहे. कळवण शहरातील जुना ओतूररोडवरील कळवण मर्चेंट्स बँकेजवळील श्री सायबर कॅफेसमोर मोकाट जनावरांपैकी दोन गायी एकमेकींना धडकत होत्या.
गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू
यावेळी भालचंद्र रघुनाथ मालपुरे (85, रा. छत्रपती शिवाजीनगर, कळवण) हे रस्त्याने जात होते. या गायींनी मालपुरे यांना शिंगावर उचलून रस्त्यावर आपटले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. मालपुरे यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मालपुरे यांचा मृत्यू झाला. याबाबत कळवण पोलीस ठाण्यात योगेश रत्नाकर मालपुरे यांच्या माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी भेट दिली. हवालदार तिडके तपास करत आहेत.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्त्यावर फिरतानाही नागरिक धास्तावले आहेत. मोकाट जनावरांचा बंदोबस्त न झाल्यास आणखी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. कळवणमधील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडला
दरम्यान, गोवंशांची अवैधरीत्या कत्तल व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हेशाखा युनिट-2 चे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाशिकरोड परिसरात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करत नऊ गायी व सहा वासरांची सुटका केली आहे. बेकायदेशीररीत्या गोवंश वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. नाशिकरोडवरून सिन्नरकडे जाणाऱ्या पुणे महामार्गावर टाटा कंपनीचा ट्रकमध्ये गायी व वासरांची अवैधरीत्या वाहतूक असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 2 च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गाडी अडवत गाडीत बघितले असता, अवैधरीत्या गाडीतून गोवंशांची वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ट्रकमध्ये एकूण नऊ गायी, सहा वासरे व एक मृत वासरू, अशी एकूण 16 जनावरे आढळली. ट्रकमालक बिलाल उस्मान मरेडिया व चालक महिंद्रसिंग जगतसिंग जाधव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांकडून एकूण 12 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आणखी वाचा