Nashik News: नाशिकच्या (Nashik) खुटवडनगर परिसरात महापालिकेच्या (Municipal Corporation) वतीने आयोजित करण्यात आलेल्या नियमित लसीकरण शिबिरात (Vaccination Camp) लस घेतल्यानंतर काही वेळातच एका 17 वर्षीय मुलीचा अचानक चक्कर येऊन कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली. श्रावणी अनिल पाटील (Shravani Anil Patil) असे मयत मुलीचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नाशिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, लसीकरणाच्या रिॲक्शनमुळे की इतर कुठल्या कारणामुळे हा मृत्यू झाला, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Nashik News: नेमकं काय घडलं 'त्या' शिबिरात?
याबाबत अधिक माहिती अशी की, खुटवडनगर परिसरातील संकटमोचन हनुमान मंदिर येथे महापालिकेच्या वतीने नियमित लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस दिली जात होती. तर दुसरीकडे, श्रावणी पाटील ही तिच्या वडिलांसोबत सर्पदंश व श्वानदंश प्रतिबंधक लस घेण्यासाठी तिथे आल्याचीही प्राथमिक माहिती आहे. लस टोचल्यानंतर काही मिनिटांतच ती जवळच असलेल्या एका मेडिकल दुकानाकडे जात असताना अचानक तिला तीव्र चक्कर आली आणि ती भर रस्त्यावर कोसळली. रस्त्यावर कोसळताना तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
Nashik News: जिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आणि तिच्या वडिलांनी तातडीने श्रावणीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Nashik News: सखोल चौकशीची मागणी; फॉरेन्सिक अहवालाकडे लक्ष
लसीकरणानंतर अवघ्या काही मिनिटांतच एका मुलीचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. हा मृत्यू लसीच्या रिॲक्शनमुळे झाला, की रस्त्यावर पडल्याने डोक्याला लागलेल्या अंतर्गत मारामुळे झाला, की यामागे आणखी काही वैद्यकीय कारण आहे? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक आणि अंतिम वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे वैद्यकीय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संपूर्ण नाशिककरांचे लक्ष आता शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे. मयत श्रावणीच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
