(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Police : नाशिक पोलिसांचं पुन्हा मिशन सोलापूर; ड्रग्ज कारखान्यानंतर आता गोदामवर धाड, कोट्यवधींचा माल जप्त
Nashik News : नाशिक पोलिसांनी पुन्हा एकदा सोलापुरात जाऊन ड्रग्जच्या गोडाऊनवर छापा टाकत रॉ मटेरियल हस्तगत केले आहे.
नाशिक : नाशिकच्या (Nashik Drug Case) ड्रग्ज प्रकरणात रोजच नवनवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत असून नाशिक पोलिसांनी पुन्हा महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. आठ दिवसांपूर्वी सोलापूर (Solapur MIDC) औद्योगिक वसाहतीत छापा टाकून एमडी निर्मितीचा कारखाना उध्वस्त केला होता. आता पुन्हा नाशिक पोलिसांनी (Nashik Police) त्याच परिसरात दुसऱ्यांदा छापा टाकला असून कारखान्यासाठी लागणारा कच्चा माल असलेले गोदाम नष्ट करण्यात आले आहे.
नाशिकचे (Nashik) ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्यानंतर यात मुंबई पोलिसांसह (Mumbai Police) पुणे पोलीस, नाशिकपोलीस कसोशीने तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी नाशिक येथील कारखाना उध्वस्त केल्यानंतर नाशिक पोलिसांनी सुद्धा शहरातील सामनगाव परिसरात एमडी प्रकरण उघडकीस आणले होते. याच प्रकरणातील धागेदोरे समोर येत असताना सोलपूरमधून नाशिकला ड्रग्ज पुरवठा होत असल्याचे समोर आल्यानंतर नाशिक पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये जात ड्रग्जचा कारखाना उध्वस्त केला. त्यानंतर याच कारखान्याच्या शेजारील भागात असलेले एमडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य आणि रसायनाचे गाेडाऊन पाेलिसांनी शाेधून काढत उद्धवस्त केले आहे.
आठ दिवसांपूर्वी सोलापूर औद्योगिक वसाहतीत धाड टाकून एमडी (मॅफेड्रॉन) (MD) तयार हाेणाऱ्या कारखाना सील केला हाेता. सामनगाव एमडी प्रकरणातील संशयित सनी पगारे याने सोलापुरात सुरू केलेला एमडीचा कारखाना नाशिक अमली पदार्थ विरोधी पथक (एनडीपीएस) आणि गुन्हे शोध युनिट एकच्या पथकाने 27 ऑक्टोबर रोजी उद्ध्वस्त केला. तिथून दहा कोटी रुपयांच्या एमडीसह कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणात नाशिकचा मनोहर काळे या संशयिताला पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याने सनीच्या सांगण्यावरुन वीस हजार रुपये प्रतिमहा नफ्याकरीता कारखान्याचा करार केला होता. तर काळे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी वैद्यनाथ वावळ याला अटक करण्यात आली. वावळने दिलेल्या माहितीनुसार कारखान्यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल एका गोदामात होता. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेची संयुक्त पथके सोलापुरात दाखल झाली व गोदामात धाड टाकून मुद्देमाल हस्तगत केला.
ड्रग्ज तस्करांवर माेक्का
पुणे पोलिसांनी (Pune Police) ललित पानपाटीलच्या (Lalit Panpatil) ड्रग्ज तस्कर टोळीला एमडी प्रकरणात ‘मोक्का’ कायदा लावला आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनीही सनी पगारे, पिवाल गँगवर माेक्का लावण्याची तयारी सुरु केली आहे. आतापर्यंत सामनगाव एमडी प्रकरणात दहा संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये गणेश संजय शर्मा, गोविंदा संजय साबळे, आतिश ऊर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी, सनी व सुमित हे पगारेबंधू, मनोज गांगुर्डे, अर्जुन पिवाल, भूषण ऊर्फ राजा गणपत मोरे, मनोहर काळे आणि वैद्यनाथ वावळ यांचा समावेश आहे. तर वडाळा गाव प्रकरणात वसीम रफिक शेख, नसरीन ऊर्फ छोटी भाभी, इम्तियाज शेख, सलमान अहमद फलके आणि शब्बीर उर्फ आयना अब्दुल अजीज मेमन यांना अटक केली. या पंधरा संशयितांना ‘मोक्का’ लावण्यात येणार आहे.