Nashik Gas Shortage: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण- इस्रायमधील संघर्षाच्या (Iran–Israel conflict) परिणामांचे पडसाद आता भारतातील उद्योगांवरही उमटू लागले आहेत. जागतिक पातळीवर ऊर्जा पुरवठा साखळीवर निर्माण झालेल्या तणावामुळे एलपीजी (LPG), पीएनजी (PNG) आणि औद्योगिक गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असून नाशिकमधील (Nashik) औद्योगिक क्षेत्रात मोठी गॅस टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील (Satpur and Ambad MIDC) अनेक कंपन्यांवर उत्पादन बंद ठेवण्याची वेळ येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Nashik Gas Shortage: एक दिवस पुरेल इतकाच गॅस साठा
नाशिकच्या अंबड आणि सातपूर औद्योगिक परिसरातील 100 हून अधिक कंपन्यांकडे सध्या केवळ एक दिवस पुरेल इतकाच गॅस साठा उरला आहे. अनेक उद्योगांना एलपीजी, पीएनजी आणि एमएनजीएल (MNGL) गॅसवर उत्पादन प्रक्रिया चालवावी लागते. मात्र सध्या गॅसचा पुरवठा अत्यंत मर्यादित झाल्याने उद्योजकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
Nashik Gas Shortage: उत्पादन तात्पुरते थांबवावे लागण्याची शक्यता
गॅस पुरवठादार कंपन्यांकडून उद्योजकांना अधिकृत ई-मेल पाठवून अनिश्चित काळासाठी गॅस पुरवठा सुरळीत होऊ शकणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांना उत्पादन तात्पुरते थांबवावे लागण्याची शक्यता आहे. गॅस टंचाई कायम राहिल्यास नाशिकच्या सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 ते 250 छोट्या-मोठ्या कंपन्यांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, गॅसच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांत एलपीजीच्या दरात प्रति किलो तब्बल 36 रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीचा थेट फटका उद्योगांना बसत असून उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Iran vs Israel War: युद्धाचा साखर उद्योगावर परिणाम; निर्यात ठप्प, दर घसरले
दरम्यान, आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता देशातील साखर उद्योगावरही उमटू लागले आहेत. युद्धानंतर केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर मर्यादा आणल्याने साखर कारखान्यांना दिलेला निर्यात कोटा जवळपास ठप्प झाला आहे. यामुळे स्थानिक बाजारात साखरेचा साठा वाढू लागला असून बाजारभावात मोठी घसरण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी साखरेचा दर सुमारे 3700 रुपये प्रति क्विंटल होता. मात्र सध्या हा दर घसरून जवळपास 3200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आला आहे. दरातील या घसरणीचा थेट परिणाम उस उत्पादक शेतकऱ्यांच्या हमीभावावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निर्यात ठप्प होणे, साठा वाढणे आणि बाजारभाव घसरणे या तिहेरी संकटामुळे साखर कारखानेही आर्थिक अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारने तातडीने उपाययोजना करून साखर उद्योगाला दिलासा द्यावा, अशी मागणी कारखानदारांकडून केली जात आहे.
आणखी वाचा
