Nashik Flood: नाशिक शहर आणि धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला (Godavari River) यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर आला आहे. सततच्या पावसाने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून रामकुंड (Ramkund) परिसरातील सर्व मंदिरे आणि रामसेतू पूल पाण्याखाली गेले आहेत. प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून संध्याकाळपर्यंत गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात आली आहे.
Gangapur Dam: गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे गंगापूर धरण (Gangapur Dam) 97 टक्के भरले आहे. कश्यपी (Kashyapi) आणि गौतमी गोदावरी (Gautami Godavari) धरणातून सोडलेले पाणी गंगापूर धरणात येत असून, तेथून सध्या 13,000 क्यूसेक वेगाने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून सोडलेले पाणी रामकुंडापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 5 तासांचा कालावधी लागतो. पावसाचे पाणी आणि धरणातील विसर्ग मिळून होळकर पुलाखालून सुमारे 24,000 क्यूसेक वेगाने पाण्याचा प्रवाह वाहण्याचा अंदाज आहे. जेव्हा होळकर पुलाजवळ 19,000 क्यूसेक विसर्ग होतो, तेव्हा गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडते. त्यामुळे सायंकाळनंतर नदी धोक्याची पातळी ओलांडून सराफ बाजार आणि भांडी बाजार परिसरात पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Nashik Flood: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची प्रतिक्रिया
नाशिकच्या पूरपरिस्थितीवर बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, "गोदावरी नदी पात्रात पाणी स्त्रोत वाढला आहे. कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणातून पाणी गंगापूर धरणात सोडण्यात येते. गंगापूर धरणातून 5 तासांनी रामकुंडात पाणी येते. गंगापूर धरण 97 टक्के भरले आहे. इशारा पातळी 13 हजार आहे, धोका पातळी 19 हजार क्युसेक पाणी होळकर पुलाजवळ पाणी पास होताना असते. यावर पाणी गेले तर भांडी बाजार परिसरात पाणी जमा होते.
Trimbakeshwar Rain: त्र्यंबकेश्वरमध्ये 24 तासात 194 मिलीमीटर पाऊस
आता सायंकाळपर्यंत 24 हजार क्युसेक पाणी येणार असल्याने धोक्याची पातळी ओलांडली जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. दुपारनंतर पावसाचे प्रमाण कमी होत आहे. नाशिक शहराच्या इतिहासात सर्वाधिक पाणी 65 हजार क्युसेक वेगाने सोडण्यात आले आहे. आता अशी परिस्थिती नाही, मात्र आपत्ती व्यवस्थापन करताना जास्त खबरदारी घेतली जाते. पाचनंतर पाणी पातळी वाढणार आहे. 194 मिलीमीटर पाऊस त्र्यंबकेश्वरमध्ये 24 तासात झाला आहे. त्यामुळे १० ते १५ टक्के पाणी गंगापूर धरणात वाढले आहे. काल वाऱ्याचा वेग जास्त होता, त्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये घरावरील पत्रे उडण्याचे प्रकार घडले, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
Nashik Flood: सुरगाण्यात दुर्दैवी घटना; एकाच मृत्यू, वलसाड येथे अडकलेले पर्यटक सुरक्षित
एकीकडे पावसाचा जोर आणि पुराचा धोका वाढला असताना सुरगाणा तालुक्यातून एक दुर्दैवी बातमी समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास नाल्यात पाय घसरून पडल्याने मोतीराम चव्हाण (वय 42) या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, शेजारच्या गुजरात राज्यातील वलसाड येथे महाराष्ट्रातील काही पर्यटक पुराच्या पाण्यात अडकले होते. मात्र, प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्यांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
Nashik Flood: प्रशासकीय यंत्रणा हाय अलर्टवर
दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने धोका टळण्याची आशा असली तरी, महापालिका आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. सायंकाळनंतर गोदाकाठावरील दुकानदारांनी आणि व्यावसायिकांनी सुरक्षित स्थळी जावे, तसेच नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी करू नये आणि धोकादायक ठिकाणी राहू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
आणखी वाचा
