Nashik Crime: नाशिकच्या गोदाघाट (Godaghat) परिसरात रविवारी पहाटे थरकाप उडवणारी घटना घडली. अमृततुल्य चहाच्या दुकानाजवळ झोपलेल्या 26 वर्षीय टॅटू आर्टीस्टवर दोन हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले, आणि तो मरण पावल्याचा समज करून घटनास्थळावरून पळ काढला. मात्र सुदैवाने या तरुणाचे प्राण वाचले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Continues below advertisement

Nashik Crime: झोपलेल्या अवस्थेत निर्घृण हल्ला

पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार, वैभव अश्रुबा नरवाडे (वय २६, रा. तारवाला नगर, लामखेडे मळा, पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळ, दिंडोरी रोड) हा युवक रविवारी मध्यरात्री दुतोंडी मारुतीजवळील अमृततुल्य चहाच्या दुकानाच्या शटरजवळ झोपलेला होता. पहाटे दोनच्या सुमारास, त्याच्या डोक्यावर अचानक जोरदार घाव घालण्यात आला. त्या घावामुळे जाग आलेल्या नरवाडेने पाहिले असता, रोशन चारोस्कर याच्यासोबत काम करणारा कृष्णा पांडे आणि त्याचा साथीदार कोयत्यासह उभे होते.

Nashik Crime: कोयत्याचे सपासप वार, मृत समजून पळून गेले

जागा झालेला नरवाडे काही कळायच्या आत, हल्लेखोरांनी त्याच्या उजव्या हातावर व डाव्या पायावर सपासप वार केले. नरवाडेचा प्रतिकार असफल ठरला. त्यानंतर नरवाडे मेला, असा समज करून दोघे हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले.

Continues below advertisement

Nashik Crime: जखमी युवकावर उपचार सुरु

या घटनेची माहिती मिळताच, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, सुनिल पवार, सहायक सतिष शिरसाठ, शरद पाटील आणि उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांनी पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी नरवाडे याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Nashik Crime: गुन्हा नोंद; हल्लेखोरांचा शोध सुरू

नरवाडेने दिलेल्या जबाबानुसार, कृष्णा पांडे आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा तसेच भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून, त्यांच्या अटकेसाठी पथक कार्यरत आहे.

Nashik Crime: मामा राजवाडेंवर आणखी एक गुन्हा दाखल

दरम्यान, भाजप पदाधिकारी आणि ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल  दाखल झालाय. विनयभंग, खंडणीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मामा राजवाडे आणि त्यांच्या साथीदारांवर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पंचवटीत एका बार चालकाकडून 50 हजार रुपयांचा हप्ता उकळण्यासाठी हे कृत्य केले होते. गंगापूर रोड गोळीबार प्रकरणानंतर मामा राजवाडे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मामा राजवाडे यांच्यावर पुन्हा एक गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

आणखी वाचा 

Nashik ITI Vedic Sanskar: नाशिकच्या ITI मध्ये मिळणार ‘वैदिक संस्कारा’चे धडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय?