सुरगाणा, नाशिक: नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खुंटविहिरजवळील मालगोंदा गावात एका विवाहित महिलेने आपल्या पतीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या करून मृतदेह तब्बल दोन महिने घरातील जुन्या शौचालयाच्या शोषखड्ड्यात दफन केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मृत व्यक्तीचे नाव यशवंत मोहन ठाकरे (वय अंदाजे 35) असून, या प्रकरणी त्याची पत्नी प्रभा यशवंत ठाकरे हिला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसी चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली असून, हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.(Nashik Crime News)
काय घडलं नेमकं?
यशवंत 14 एप्रिल 2025 रोजी अचानक बेपत्ता झाला होता. दोन महिने उलटूनही घरी परत न आल्याने त्याचे आई-वडील चिंतेत होते. जेव्हा त्यांनी प्रभाकडे विचारणा केली, तेव्हा तिने यशवंत गुजरातमधील बिलीमोरा येथे मजुरीसाठी गेला असल्याचे सांगितले. मात्र, पावसाळा सुरू होऊनही तो घरी न आल्यामुळे संशय अधिकच बळावला. घराबाहेरच्या ओसरीवर अचानक केलेले खोदकाम, व शेणामातीने सारवलेला भाग पाहून कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रभाला चौकशीसाठी बोलावले, परंतु सुरुवातीला तिने सर्व आरोप फेटाळले.
अखेर उलगडला खूनाचा कट्टा
यशवंतचा लहान भाऊ उत्तमची पत्नी मेथू प्रभाच्या घरी आली. यावेळी दारात पडलेली यशवंतची चप्पल पत्नी प्रभाने मांडीखाली लपवली. त्यामुळे उत्तमच्या पत्नीला संशय आला आणि तिने ही बाब तिचे पती उत्तमला सांगितली. उत्तमने तपास घेतला असता मयत यशवंतच्या घराच्या दक्षिणेस असलेल्या पडक्या शौचालयाचा शोषखड्याजवळ कुजलेला वास येत होता. तसेच शोषखड्याजवळ माशाही घोंगावत असल्याचे आढळून आल्याने त्याने खड्यातील माती उकरुन पहिली. यानंतर त्या ठिकाणी मृतदेह आढळून आला.
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांनी यशवंतचा भाऊ उत्तम याच्या पत्नीने मेथू हिने प्रभाच्या घरात दारात पडलेली यशवंतची चप्पल लपवताना पाहिली. यावरून संशय गडद झाला. तपासाअंती घराच्या मागे असलेल्या शोषखड्ड्यातून दुर्गंधी आणि माश्यांची हालचाल दिसून आली. खड्डा उकरल्यानंतर यशवंतचा कुजलेला मृतदेह तीन तुकड्यांत भरून गोणीत ठेवलेला आढळून आला. पोलिसांनी प्रभाला अटक करून चौकशी केली असता तिने कबुली दिली, कुऱ्हाडीने वार करून यशवंतची हत्या केली व त्याचे शरीर तुकडे करून खड्ड्यात टाकले. दुर्गंधी येऊ नये म्हणून औषध टाकल्याचेही तिने मान्य केले. या घटनेने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृत यशवंत मागे एक मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार सोडून गेला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरू केला आहे.