नाशिक : शहर आणि परिसरात मंगळवारी सायंकाळी 5 नंतर वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने (Rain) हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्याने शहरातील काही भागात वृक्ष उन्मळून पडले, काही भागात रस्त्यावर पाण्याचे तळे साचले होते, शहरातील उड्डाणपूलवरुन ही पावसाचे पाणी खालील रस्त्यावर पडत असल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर, खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाला. यादरम्यान, महापालिका सिटी बसचालक (Bus) आणि एका महिलेचा चांगलाच वाद झाला असून या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, बस न थांबवल्याच्या रागातून महिलेकडून बस चालकाची कॉलर पकडून त्याला जाब विचारला जात आहे. त्यावर, तुम्ही मारहाण करू नका, हवं तर माझी तक्रार करा, असे बस चालक बोलताना पाहायला मिळत आहे.
नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बस चालकांवर एक महिला चांगलीच संतापल्याचं पाहायला मिळालं. बसचालक आणि वाहकासमोर महिलेचा रुद्रावतार पाहून स्थानिक प्रवासीही अचिंबित झाले होते. नाशिकमध्ये महिलेकडून सिटी बस थांबविण्याचा प्रयत्न करूनही बस न थांबल्याने महिला संतापली होती. मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसात महिलेकडून सिटी बस थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चालकाने बस थांबवलीच नाही. आपल्या लहान बाळासह महिला बसच्या मागे धावत गेली, तरी देखील बस निघून गेल्याने महिला जास्त संतप्त झाली होती. त्यानंतर, महिलेने निमाणी बस स्थानकापासून ते नाशिकरोड पर्यंत असा 11 किलोमीटरपर्यंत रिक्षाने बसचा पाठलाग केला. तसेच, नाशिकरोड बस स्थानकात बसचालकाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी, बस का थांबवली नाही, याचा जाब विचारत महिलेन चक्क बस चालकाची कॉलर पकडली होती. हे दृश्य पाहून स्थानिक प्रवाशांनी मध्यस्थी करत महिलेला शांत केले.
मंगळवारी नाशिकमध्ये मुसळधार पाऊस
नाशिकमध्ये अवघ्या अर्धा ते पाऊण तास मुसळधार पाऊस झाला, या पावसामुळे गटारीतले पाणी पुन्हा एकदा थेट गोदावरी नदीत मिसळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावसाळ्यापूर्वी महापालिका प्रशासनाने केलेले काम आणि केलेले दावे पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे चित्र होते, तसेच काही महिन्यांपूर्वीच स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी नदी परिसरात गटारीतले पाणी थेट गोदावरी नदीत जाऊ नये यासाठी करोडो रुपये खर्च करून भुयारी गटारी योजना राबविण्यात आली होती. मात्र, ही योजना फोल ठरल्याचे दिसत आहे. ही योजना राबवून देखील पुन्हा एकदा गटारीतले पाणी थेट गोदावरी नदीमध्ये जात असल्याचे चित्र पाहायला मिळाल्याने गोदाप्रेमींनी नाराजी व्यक्त केलीय. दरम्यान, नाशिकमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या दोन तासांच्या पावसाने शहर परिसरात 30 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून 25 ते 30 किलोमीटर प्रतितास वेगाने वारा वाहत होता.
