Nashik News नाशिक : सिटी लिंक बससेवा (Nashik Citylink Bus Service) पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. सिटीलिंकच्या वाहकांचे दोन महिन्यांचे वेतन रखडल्यामुळे त्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. ऐन परिक्षांच्या काळात सिटीलिंक बससेवा बंद झाल्याने पालक आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. बस थांब्यावर प्रवाशी बसची वाट बघत ताटकळत उभे असल्याचे चित्र आहे...
नाशिक महापालिकेकडून (Nashik NMC) सिटीलिंक ही बससेवा चालवली जाते. नोव्हेंबर महिन्यात वाहकांनी पगार रखडल्याने संप पुकारला होता. त्यानंतर यावर तोडगा निघून बससेवा पूर्ववत झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा सिटीलिंकच्या वाहकांचे गेल्या दोन महिन्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे वाहकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून कामबंद आंदोलन पुकारले आहे.
नाशिककरांचे प्रचंड हाल
तपोवनमध्ये असलेल्या बस डेपोतून आज सकाळपासून एकही बस बाहेर पडलेली नाही. अचानक बस बंद झाल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. तसेच आता परीक्षा सुरु असल्याने विद्यार्थी ठिकठिकाणी बस थांब्यावर ताटकळत उभे असल्याचे दिसून येते. तर नोकरदार वर्गालाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बस सेवा ठप्प झाल्याने प्रत्येकाच्या खिशाला भुर्दंड बसत असून. आंदोलनाचा फटका सिटी लिंक बस व्यवस्थापनाला देखील बसत आहे.
पगार मिळत नसल्याने वाहकांकडून वारंवार आंदोलन
गेल्या दोन ते तीन महिन्याचा पगार थकल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. अचानक काम बंद आंदोलन सुरु केल्याने नाशिक शहरातील बससेवा खंडित झाली आहे. नाशिकच्या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यांकडून वारंवार आंदोलन केली जात असून आता त्यांनी पगार नाही, तर काम देखील नाही, अशी भूमिका घेतली आहे. आता सिटीलिंक व्यवस्थापन यावर काय तोडगा काढणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
कर्मचारी वर्गाची दिशाभूल
गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढ झालेली नाही. गेल्या दोन वर्षे कोणत्याही प्रकारचा बोनस देण्यात आलेला नाही. यासह कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह खात्यात निधी देखील भरलेला नाही. सिटीलिंक प्रशासन व ठेकेदार संगनमताने कर्मचारी वर्गाची दिशाभूल करीत असल्याचे वाहकांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Kisan Sabha : किसान सभेचा राज्य सरकारला तीन दिवसाचा अल्टीमेटम; प्रसंगी मुंबईपर्यंत लाँग मार्च काढणार