Nashik News : 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. या वर्षातील एक गोष्ट अशी दाखवा की, संजय राऊत म्हणाले आणि तसं झालं. मी गंमतीने असं म्हणतो की, 'ते चुकीचा चिठ्ठी काढणारा पोपट..' तुम्ही माध्यमांनी देखील त्यांना सिरियस घेऊ नका, असा खोचक टोला मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraje Desai)  यांनी संजय राऊत (sanjay Raut) यांना दिला आहे. तसेच तीन पक्षाचे सरकार हे बुलेट सारखे वेगाने धावणारे सरकार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राम लक्ष्मणाची जोडी आहे, ही जोडी कधीही तुटणार नाही असा विश्वासही देसाई यांनी व्यक्त केला.


आज मंत्री शंभूराज देसाई हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले होते. यावेळी यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज नाशिकरोड आणि देवळाली गाव (Deolali) येथे आले होते. सुरुवातीला त्यांनी वसुंधरा देशमुख यांचे निधन झाल्याने देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी मामाचे गाव असलेल्या देवळाली गाव येथे भेट दिली. अजित पवार गटाने आज शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली यावर शंभूराज देसाई म्हणाले की, मला याबाबत कल्पना नाही. मी प्रवासात होतो. जरी भेट घेतली असेल, तर ते सगळेच म्हणत आहे की, आम्ही राष्ट्रवादी सोडली नाही. आमचे नेते पवार साहेब आहे. ते राष्ट्रवादीचेच (NCP) मंत्री आहे. सरकारला आशीर्वाद द्यायचा की नाही, त्यांनी शरद पवार ठरवावे, असेही देसाई म्हणाले. तसेच हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पवार साहेब काय बोलतात, हे बघावं लागेल. काल अजित पवार यांनी सांगितलं की, शरद पवार यांचा फोटो दालनात लावलेला आहे. ही औपचारिक भेट असेल यात राजकीय काही वाटत नाही, असेही ते म्हणाले. 


ते पुढे म्हणाले की, सध्याचे सरकार हे तीन पक्षाचे सरकार असून राज्याचा विकास आता वेगाने होणार आहे. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे 45 खासदार राज्यातून निवडून येतील. तसेच विधानसभा निवडणुकीत 225 पेक्षा जास्त आमदार निवडून येथील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून सरकारमध्ये 200 प्लस बहुमत केलं आहे. महायुतीत कुणाला सहभागी करायचं, हे ठरवण्याचा अधिकार नरेंद्र मोदी, अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना आहे. तसेच उर्वरित मंत्रीमंडळ विस्तार देखील लवकरच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच अजित दादा सुद्धा त्यातलेच एक बंधू आहे..निधी वाटपाचा निर्णय वित्त मंत्री घेतात. त्यावर अंतिम अधिकार मुख्यमंत्री यांचा असतो. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केलं. त्यावेळचे आणि आताचे मुख्यमंत्री यात फरक आहे. आम्हाला आता तसा अनुभव येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री यांना दिला असल्याचे ते म्हणाले. 


राम लक्ष्मणाची जोडी तुटणार नाही.... 


राऊत यांच्या आरोपांवर उत्तर देताना म्हणाले की कलंक म्हटल्याने कुणी कलंक होत नाही. त्याचबरोबर उद्याच्या अधिवेशनाच्या आधी विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे, यावर ते म्हणाले, विरोधी पक्षाचा अधिवेशनावर बहिष्कार हा नित्यनेम झाला आहे. मी सुनील राऊत यांना सांगतो, तुम्ही चहापानाला या. आपले प्रश्न मांडा. सरकार सत्ताधारी आणि विरोधक हा भेदभाव करणार नाही. तसेच तीन पक्षाचे सरकार तिन्ही इंजिन एकमेकांच्या समन्वयातून चालतील. येणाऱ्या काळात या सरकारच्या कामाचा वेग वाढल्याचे दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवार आणि फडणीस यांच्याशी समन्वय साधून पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील. जयकुमार गोरे यांच्या विधानाला उत्तर देताना म्हणाले की, मलाही तसं बोलता येतं. कोण हायकमांड आहे ते. असं वक्तव्य करून कुणाला तरी कमी लेखणे, योग्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राम लक्ष्मणाची जोडी आहे ही जोडी कधीही तुटणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


इतर संबंधित बातम्या : 


Crime News: शंभूराज देसाई यांचा पीए असल्याचे सांगून दोन लाखांना गंडा, जालन्यात गुन्हा दाखल