Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावरील आमरण उपोषण (Manoj Jarange Patil Azad Maidan Protest) आणखी एका दिवसासाठी सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, यासाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे. आता नाशिकमधील मुस्लीम महिला मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी सरसावल्या आहेत. चुलीवर भाकरी थापटून तब्बल 2500 भाकऱ्या मुंबईच्या दिशेने मुस्लीम महिलांनी पाठवल्या आहेत. 

मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा आंदोलकांना नाशिक जिल्ह्यातील येवला-लासलगाव मतदारसंघातून भाकरी पुरविल्या जात आहे. या व्यवस्थेत मुस्लीम समाजाचाही मोठा पुढाकार दिसून येत आहे. मुस्लीम समाजाच्या महिलांनी मराठा आंदोलनकर्त्यांसाठी तब्बल 2500 भाकऱ्या तयार करून खारीचा वाटा उचलला आहे.  

भाकरी, चपाती मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना 

तर 'एक भाकर समाजासाठी' हे ब्रीद घेऊन नाशिकच्या येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील मराठा बांधव भाकरी, चपाती, चटणी, ठेचा व जेवणाचे साहित्य घेऊन मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले. एक भाकर समाजासाठी यात ओबीसी, मुस्लीम समाजाकडूनही भाकरी, चपाती देण्यात आल्या आहे. यावेळी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी लासलगाव जवळील विंचूर येथे नाशिक छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गावर घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. 

मराठ्यांनी सीएसएमटीच्या मधोमध शेगडी पेटवून बनवले पोहे 

दरम्यान, कालपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसामुळे मराठा आंदोलकांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. या मराठा आंदोलकांना पिण्याचे पाणी, शौचालयात पाणी आणि निवाऱ्याची व्यवस्था पुरवण्यात आलेली नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी मराठा आंदोलक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर उतरले. मराठा आंदोलकांनी या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली. प्रशासनाकडून दुसऱ्या दिवशीही सीएसएमटी परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवली आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांचे काल खाण्यापिण्याचे हाल झाले होते. अनेक मराठा आंदोलक काल रात्रभर उपाशी राहिले होते. रात्रभर सीएसएमटी स्थानकात मुक्काम करावा लागल्याने मराठा आंदोलक चांगलेच वैतागले होते. सकाळी आजुबाजूला खाण्याचा काही पर्याय नसल्याने संतापलेल्या मराठा आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाबाहेरील रस्त्याच्या मधोमध शेगडी पेटवून पोहे बनवायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले होते.

आणखी वाचा 

Amit Shah And Eknath Shinde Meeting On Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या 'त्या' मुख्य मागणीवर अमित शाह यांची एकनाथ शिंदेंसोबत चर्चा; बैठकीत नेमकं काय काय घडलं?