Mama Rajwade Sunil Bagul : ठाकरे गटाचे माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे (Mama Rajwade) आणि माजी उपनेते सुनील बागुल (Sunil Bagul) यांच्यावर घरात घुसून हाणामारी करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्या जामिनानंतरच त्यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यासह सात जणांविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बागुल यांच्याविषयी समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या चित्रफितीवरून गुन्हा दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर बागुल आणि राजवाडे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या जमीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
जामीन मंजूर होणार की नाही?
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला असल्याची माहिती समोर आली होती. एकीकडे राजवाडे आणि बागुल यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने ते फरार होते, तर दुसरीकडे मुंबईत त्यांचा प्रवेश सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता. मात्र, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या एक्सवरील पोस्टनंतर भाजपकडून हा प्रवेश तातडीने रद्द करण्यात आल्याची चर्चा रंगली होती. भाजप प्रवेश निश्चित होताच ठाकरे गटाने सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांची पक्षातून हकालपट्टी केली. ठाकरे गटाच्या महानगरप्रमुखपदी माजी आमदार वसंत गिते यांच्या सुपुत्र माजी उपमहापौर प्रथमेश गिते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बागूल, राजवाडे यांचा जामीन मंजूर झाल्यास त्यांचा भाजप प्रवेश लवकरच होण्याची शक्यता आहे. आता मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांना जामीन मंजूर होतो की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते की, भाजपची जादू -अतुलनीय आहे. कोणत्याही पक्षाला ती आवडत नाही. नाशिकच्या शिवसेना कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. अटक टाळण्यासाठी ते फरार झालेत. अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. पोलिसांनी मकोका लावण्याची योजना आखल्याची बातमी आली. कमाल म्हणजे हे फरार आता भाजपमध्ये सामील होत आहेत. भाजपच्या धुलाई यंत्रात सर्व आरोप धुवून काढले गेल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. यानंतर ऐनवेळी सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचे प्रवेश स्थगित करण्यात आले होते.
आणखी वाचा