Malegaon Tipu Sultan Photo Row: उपमहापौरांच्या दालनात झळकला टिपू सुलतानचा फोटो; शिवसेना-हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मालेगावात राजकारण तापलं!
Malegaon Tipu Sultan Photo Row: मालेगाव महानगरपालिकेत नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच शहरातील राजकारण तापले आहे.

Malegaon Tipu Sultan Photo Row: मालेगाव महानगरपालिकेत (Malegaon Municipal Corporation) नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच शहरातील राजकारण तापले आहे. उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतानचे (Tipu Sultan) छायाचित्र लावल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना (शिंदे गट) आक्रमक झाली असून, शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
Malegaon Tipu Sultan Photo Row: नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी घेतला पदभार
गेल्या शनिवारी मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी ‘इस्लाम’ पक्षाच्या नसीरिन बानो खालीद शेख यांची, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीचे शान-ए-हिंद यांची निवड झाली होती. बुधवारी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी रीतसर पदभार स्वीकारला. मात्र, पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्याच दोन दिवसांत उपमहापौरांच्या दालनातील छायाचित्रामुळे नव्या वादाला तोंड फुटले.
Malegaon Tipu Sultan Photo Row: सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शुक्रवारी उपमहापौरांच्या दालनात लावलेल्या टिपू सुलतान यांच्या छायाचित्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यानंतर शहरातील राजकीय वातावरण तापले. अनेकांनी या कृतीवर तीव्र टीका करत उपमहापौरांवर निशाणा साधला.
Malegaon Tipu Sultan Photo Row: शिवसेना शिंदे गट आक्रमक
या प्रकरणाची दखल घेत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक थेट महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात दाखल झाले. त्यांनी या छायाचित्राचा निषेध नोंदवत, “तत्काळ फोटो काढण्यात यावा” अशी मागणी केली. “जोपर्यंत हा फोटो काढला जात नाही, तोपर्यंत आमचे निदर्शन सुरू राहील. गरज पडल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशाराही शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला. या घटनेनंतर मालेगावातील हिंदुत्ववादी संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.
Malegaon Tipu Sultan Photo Row: उपमहापौरांची प्रतिक्रिया
वाद वाढत असतानाच उपमहापौर शान-ए-हिंद यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले आहे. “टिपू सुलतान हे इंग्रजांविरोधात लढणारे स्वातंत्र्ययोद्धे होते. भाजपच्या एका खासदारांनीही याबाबत विधान केले होते. महाराष्ट्र सरकारच्या एका राजपत्रात (गॅझेट) त्यांच्या जयंतीचा उल्लेख आहे. मग विरोध करणारे नेमके कोण आणि कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
Malegaon Tipu Sultan Photo Row: 'उपमहापौरांवर निलंबनाची कारवाई करावी'
मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावण्याचा निर्णय हा जाणीवपूर्वक दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. उपमहापौरांनी आपल्या पदाची मर्यादा ओलांडली असून हा प्रकार निषेधार्ह आहे. आमची प्रशासनाला स्पष्ट सूचना आहे की, पुढील 48 तासांत संबंधित फोटो तात्काळ हटवण्यात यावा आणि या निर्णयासाठी जबाबदार असलेल्या उपमहापौरांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी. जर 48 तासांत कारवाई झाली नाही, तर शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना मालेगावात येऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल. त्यानंतर निर्माण होणाऱ्या कोणत्याही कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. महानगरपालिका ही सर्व समाजाची संस्था आहे. ती कोणत्याही वादग्रस्त व्यक्तीच्या गौरवासाठी वापरली जाणार नाही, हा आमचा ठाम इशारा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी दिली आहे.
Malegaon Tipu Sultan Photo Row: टिपू सुलतानचा फोटो अखेर हटवला
दरम्यान, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौरांच्या दालनात लावण्यात आलेला टिपू सुलतान यांचा फोटो अखेर हटवण्यात आला आहे. उपमहापौरांच्या दालनातील या फोटोमुळे शहरात वाद निर्माण झाला होता. शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटना आणि काही नगरसेवकांनी तीव्र विरोध केल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला. वाढता तणाव आणि संभाव्य कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता नगरसचिवांनी हस्तक्षेप करत “वाद टाळण्यासाठी” संबंधित फोटो काढण्याचे आदेश दिले. फोटो हटवल्यानंतर सध्या परिस्थिती नियंत्रणात असून प्रशासनाकडून पुढील घडामोडींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
























