नाशिक :चंद्रपूरसह राज्याचं लक्ष लागलेल्या मालेगाव (Malegaon) महापालिकेतही कोणाची सत्ता स्थापन होणार, कोण महापौर होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. विशेष म्हणजे येथील महापालिकेत भाजप आणि काँग्रेसनं एकत्र येत भारत विकास आघाडी नावाचा गट स्थापन केला होता. या गटाची नोंदणी 30 जानेवारीला नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात करण्यात आली होती. मात्र, अवघ्या दोन दिवसानंतर या गटाची नोंदणी करु नये असा अर्ज भाजपच्या नगरसेवकांनी दिला. त्यामुळे, मालेगावमध्ये कोणता पक्ष महापौर पदासह सत्तेत असेल हे अद्यापही ठरलेलं नाही. त्यातच, आता एमआयएमच्या आमदाराने शिवसेना (Shivsena) नेते तथा मंत्री दादा भुसे (Dada bhuse) यांची भेट घेतल्याने एमआयएम आणि शिवसेना एकत्र येणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. मालेगावात इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी मालेगाव सेक्युलर फ्रंट म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडे दोन्ही पक्षाचे मिळून 40 नगरसेवक आहेत. तर, बहुमताचा आकडा 43 आहे,
मालेगाव महापालिका निवडणुकीच्या निकालात कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर सत्ता मिळेल अशा जागा मिळालेल्या नाहीत. मालेगावात इस्लाम पक्षाल सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत. इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी मालेगाव सेक्युलर फ्रंट म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडे दोन्ही पक्षाचे मिळून 40 नगरसेवक आहेत. मालेगावात महापौरपदासाठी 7 फेब्रुवारीला निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. मालेगाव महापालिकेत बहुमताचा आकडा 43 असून मालेगाव सेक्युलर फ्रंटला काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यास त्यांचा महापौर मालेगावात बसू शकतो. तर, दुसरीकडे एमआयएमनेही जुळवाजुळव सुरू केल्याचं दिसून येत आहे.
मालेगावत एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल व गटनेते अब्दुल मलिक युनूस इसा यांनी मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. येत्या दोन दिवसांवर होणार असलेल्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एमआयएम व शिवसेना नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीमुळे राजकीय वातावरण ढवळले आहे. याबाबत, आमदार मुफ्ती इस्माईल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणे टाळले. तर, गटनेते अब्दुल मलिक युनूस इसा यांनी भेटीबद्दल बोलणे टाळत गोलमाल उत्तरे दिल्याने एमआयएम आणि शिवसेना एकत्र येणार का, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
मालेगाव महापालिकेत एमआयएमचे 21, इस्लाम पार्टीचे 35, शिवसेनेचे 18, भाजपचे 2 व काँग्रेसचे 3 असे एकूण संख्याबळ आहे.. महापौर पदासाठी मॅजिक फिगर 43 आहे. त्यामुळे, काँग्रेसकडील 3 नगरसेवक मालेगाव महापालिकेत किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. मात्र, इतर पक्षाकडून निवडून आलेले काही नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाल्याचेही सध्याचे चित्र आहे. त्यामुळे, पुढील दोन दिवसांत मालेगाव महापालिकेसाठी वेगवान घडामोडी घडू शकतात.
मालेगावातील पक्षीय बलाबल
इस्लाम पार्टी : 35एमआयएम : 21शिवसेना : 18समाजवादी पार्टी :5काँग्रेस : 3भाजप : 2
दरम्यान, स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आज मालेगावी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मोठ्या संख्येने नागरिक देखील उपस्थित होते. मंत्री दादा भुसे यांच्यासह मालेगाव मध्यचे माजी आमदार असिफ शेख यांनी देखील अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
हेही वाचा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
