Nashik Bhagar : भगर (Bhagar) कुणाला माहिती नाही असा माणूस सापडणार नाही. भगर ही आपण अनेकदा उपवासाला खाल्ली जाते. शिवाय अनेकदा भाताऐवजी जेवणात भगरीचा वापर केला जातो. पण अनेकदा भगर शिजवणे म्हणजे साधारण पंधरा ते वीस मिनिटांचा अवधी लागतोच. मात्र हीच भगर तुम्हाला अवघ्या तीन मिनिटांत बनवून दिली तर? 


होय, तीन मिनिटांत. दोन मिनिटांत बनणाऱ्या मॅगीची गोष्ट करत नाही तर सर्वसामान्य घरात वापरली जाणाऱ्या भगर या पदार्थांविषयी बोलत आहे. अनेकजण उपवासाला सर्रास भगर शिजवून खातात. तर काहीजण त्याचा जेवणातही वापर करतात. मात्र हीच भगर तुम्हाला आता काही मिनिटात शिजवून मिळणार आहे किंवा तयार करता येणार आहे. नाशिकमधील (Nashik) प्रसिद्ध यश ग्रुप कंपनीजने ही अनोखे उत्पादन तयार केले असून याचा बोलबाला सध्या सुरु आहे. गेल्या वीस वर्षांपासून ही कंपनी भगरसाठी स्पेशल कंपनी म्हणून नावाजलेली आहे. नाशिकमध्ये सध्या तीन युनिट कार्यरत असून याच माध्यमातून सर्रास वापरल्या जाणाऱ्या भगर पदार्थांबाबत त्यांनी अनोखे उत्पादन सुरु केले आहे. 


नाशिकचे भगर उत्पादक व ‘सोनपरी’ भगरीचे निर्माते महेंद्र छोरिया (Mahendra Choriya) म्हणाले कि, 'रेडी टू कुक'  (Ready To cook) या टॅगलाईन खाली हे उत्पादन सुरु करण्यात आले आहे. यापूर्वी भगर तयार करायच म्हटलं कि, भगर निवडून घेणे, कढईत तेल टाकून इतर मसाले टाकून म्हणजेच जिरे, शेंगदाणा कूट आदींचा समावेश करावा लागत असे. त्यानंतर भगर टाकून तिला शिजवले जात असे. मात्र यात खूप वेळ खर्ची होत होता. यामुळेच रेडी टू कुक नावाचे भगरचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे. यात दीडशे ग्रामपासून पुढे पॅकिंग तयार करण्यात आली असून भगर शिजवताना समावेश होणाऱ्या सर्वच पदार्थांचा समावेश एकत्रित करण्यात आला आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही भगर शिजवायला घ्याल तेव्हा फक्त तीन मिनिटे उकळत्या पाण्यात ठेवल्यानंतर तुम्हाला भगर खाण्यासाठी तयार होणार आहे. 


महाराष्ट्र वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. अनेक वारकरी पंढरीची वारी, नाथांची वारी याचबरोबर अनेक वाऱ्या करत असतात. अशावेळी कमीत कमी वेळेत ही भगर वारकरी समुदायासाठी महत्वपूर्ण असणार आहे. त्याचबरोबर प्रवास करताना देखील नाश्त्यासाठी भागरचा प्रयोग होऊ शकतो. जर तीन मिनिटात तुम्हाला हेल्थी फूड उपलब्ध होत असेल तर तुम्ही जरून ते वापरू शकतात, असा विश्वास छोरीया यांनी व्यक्त केला आहे. 


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण 


शासनाच्या कृषी विभागामार्फत पौष्टिक तृणधान्य प्रक्रिया उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल नाशिकचे भगर उत्पादक व ‘सोनपरी’ भगरीचे निर्माते महेंद्र छोरिया यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘रेडू टू कूक भगर सेहतचेही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ‘रेडू टू कूक भगर’ ही राज्यातील नव्हे तर देशातील पहिली भगर असणार आहे. त्यामुळे नाशिकच्या नावलौकिकामध्ये आणखी एक भर पडली आहे. नाशिकचे भगर उत्पादन महेंद्र छोरिया यांनी ‘सोनपरी’ भगर उत्पादनाच्या माध्यमातून भगरीला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविले आहे. 2023 हे वर्ष राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर तृणधान्य वर्ष म्हणून साजरे होत आहे.


तीन मिनिटांत भगर तयार 


नाशिकमध्ये असलेल्या युनिटमध्ये हे उत्पादन घेतले जात आहे. या ठिकाणी अनेक मशिन्सच्या माध्यमातून दीडशे ग्रॅमचे पॅकिंग केले जाते. हे पॅकिंग करताना यात चांगलं तूप, हिरवी मिरची, मीठ, जिरे शेंगदाण्याचे कूट सगळं मिश्रण केले जाते. त्यामुळे जेव्हा आपण शिजवणार असू त्यावेळी यातला कुठलाही पदार्थ टाकण्याची गरज नसते. साधारण दीडशे ग्रॅमसाठी पन्नास रुपये किंमत आकारली जाण्याची शक्यता आहे. येत्या काळात मसाले भगर, उपवासाचा शिरा, उपवासाचे थालीपीठ आदी पदार्थ बनवणार असून रेडी टू कुक भगरनंतर थेट रेडी टू इट भगर उपक्रम सुरु करण्याचा मानस असल्याचे छोरीया म्हणाले.