Maharashtra SSC Board Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज मंगळवारी (दि. 13) जाहीर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये निकालाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. आता ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी निकाल जाहीर केला. 

यंदाचा दहावीचा निकाल 94.10 टक्के लागला आहे. तर नाशिक विभागाचा निकाल 93.04 टक्के आहे. यंदाच्या निकाल पुन्हा मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात एकूण 96.14 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलं उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 92.31 इतकी आहे. मुलीची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83 ने पुढे आहे. 

विभाग निहाय निकाल

पुणे -94.81 टक्के

नागपूर- 90.78 टक्के

संभाजीनगर- 92.82 टक्के

मुंबई-95.84 टक्के

कोल्हापूर- 96.78 टक्के

अमरावती-92.95 टक्के

नाशिक- 93.04

लातूर-92.77

कोकण- 99.82

दरम्यान, विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर तसेच इतर अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येणार आहे. त्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका वितरित करण्यात येतील.  

कुठे पाहता येणार निकाल? - https://results.digilocker.gov.in

- https://sscresult.mahahsscboard.in

- http://sscresult.mkcl.org

- https://results.targetpublications.org

निकालाची ठळक वैशिष्ट्ये 

1. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतची टक्केवारी 94.10 आहे.

2. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 28,512 खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 28,020 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 22,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 80.36 आहे. 

3. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 24,376 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23,954 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी 9,558 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 39.44 आहे.

अकरावीच्या प्रवेशासाठी संपूर्ण प्रक्रिया यंदा ऑनलाईन

दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना आणि पालकांना अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजांमध्ये जावं लागतं, त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते. ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा अकरावीच्या प्रवेशासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मंडळाने यापूर्वीच एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI