Nashik Ganeshotsav : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लाडक्या गणरायाच्या (Ganesh) आगमनाची जोरदार तयारी सुरु आहे. अशातच यंदा डीजेच्या (DJ) दणदणाटात सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) पारंपरिक मिरवणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावर कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी वाहतूक मार्ग पाहणी, विद्युुत तारा, मंडळ पदाधिकार्यांच्या सूचनांचा विचार नाशिक (Nashik) पोलिसांकडून करण्यात आला.
तब्बल दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा बाप्पाचे धुमधडाक्यात आगमन होणार आहे. यासाठी नाशिक शहरातील मंडळांची जय्यत तयारी सुरु असून आता नाशिक पोलिसांनी देखील या पार्श्वभूमीवर पाहणी केली आहे. नाशिक शहरात विसर्जनाच्या दिवशी मिरवणूक ज्या मार्गाने जाते, त्या मार्गावर पोलीस आयुक्तांनी पाहणी केली आहे. आगामी गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने पोलिस व महसूल प्रशासनाच्या वतीने नाशिक शहरातील मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली.
दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र मागील दोन वर्ष गणरायाचे आगमन झाले, मात्र सर्वत्र शांततेचे वातावरण होते. मात्र यंदा घरोघरी लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात येणार असून त्याच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दहा दिवस मनोभावे आराधना केल्यानंतर बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जातो. गुलालाची उधळण करीत डीजेच्या तालावर विसर्जन मिरवणूकीत भक्तगण तल्लीन होऊन जातात. भाविकांना विसर्जन मिरवणूकीत कुठलीच अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पोलिस व महसुल विभागाच्या वतीने मिरवणूक मार्गाची व विसर्जन स्थळ सरकारी तलावाची पाहणी करण्यात आली.
विसर्जन स्थळाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने व मिरवणूक मार्गाच्या डागडूजी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त अमोल तांबे आदींसह शहरातील पोलीस दल यांच्यासह नगर पालिका, महावितरण, टेलीफोन व इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांकडून दूध बाजार,मेन रोड, रविवार कारंजा आदी भागांची पाहणी करण्यात आली. दरम्यान गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने यापूर्वीच गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली आहे.
यंदा डीजेचा दणदणाट?
यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि डीजेच्या दणदणाटात धुमधडाक्यात होणार आहे. तर नाशिकमध्ये देखील गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. याबाबत नाशिक गणेश मंडळाची बैठक पार पडली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून ब्रेक लागलेल्या दहीहंडी आणि गणेशोत्सवला यंदा हिरवा कंदील मिळाला आहे. कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अडकलेला दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाला कोणतेही निर्बंध असणार नाही. त्यामुळे गणेशोत्सव यंदा धुमधडाक्यात होणार आहे.