Nashik Gram panchayat : राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकांचा (Grampanchayat Election) प्रचार शिगेला पोहचला असून जिकडं तिकडं रात्रीचं दिवस करण्याचे काम सुरु आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात देखील 196 ग्रामपंचायत निवडणुका होत असून यातील सामनगाव ग्रामपंचायत (Samangaon) चर्चेत येऊ लागली आहे. एकाच नावाच्या दोन महिला उमेदवार सरपंच पदाच्या (Sarpanch) शर्यतीत असल्याचे चर्चा रंगली आहे. 


ऐन थंडीत सध्या गावाकडचं वातावरण अगदी हॉट झाल असून जिकडं तिकडं फक्त उमेदवार अन कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळत आहे. नाशिकसह राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक होत असून आजचा प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याचे प्रचार शिगेला पोहचला आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील सामनगाव ग्रामपंचायत चर्चेचा विषय ठरत आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी दोन महिला उभ्या असून दोघींचे नाव, आडनावे सेम टू सेम असल्याचे मतदारांचा गोंधळ तर होणार नाही ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या या दोन्ही सरपंच पदाच्या उमेदवार प्रचारात रंगल्या असून येत्या रविवार मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 


नाशिक तालुक्यातील सामनगाव ग्रामपंचायत ची 2022 ते 2017 पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान येत्या रविवारी पार पडणार आहे. या निवडणुकीत महापालिकेचे नाशिक रोड विभागाचे माजी प्रभाग सभापती विशाल संगमनेरे व उपसरपंच सचिन जगताप यांच्या नेतृत्वाखाली सामनगाव ग्रामविकास पॅनल तर नाशिक पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल ची स्थापना करण्यात आली आहे निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच पदासाठीच्या दोन्ही उमेदवारांची नावे कविता व आडनावे जगताप असल्याने अटीतटीची निवडणुक होणार असल्याचे समजते. एक कविता ग्रामविकासाच्या मुद्द्यावर तर दुसरी कविता परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज झाली आहे.  दोन्ही पॅनलचे नेते वार्डनिहाय फिरून प्रचाराचा शेवट करत आहेत. नवे व जुने सामनगाव, झोपडपट्टी वसाहत, पहाडी बाबा, राखेची आळी, मळे परिसर, कपुर रस्ता, जुने सामनगाव आदी ठिकाणी उमेदवार व कार्यकर्ते घरोघरी प्रचार करीत आहेत तर डिजिटल माध्यमांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. 


आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने रात्री उशिरापर्यंत प्रचार रंगण्याची शक्यता आहे. सामनगाव ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण स्त्री असल्याने थेट सरपंच पदासाठी ग्रामविकास पॅनलच्या कविता नंदकिशोर जगताप व परिवर्तन पॅनलच्या कविता विजय जगताप या रिंगणात उतरल्या आहेत. या ग्रामपंचायतीत सरपंच एक व सदस्य 13 अशी संख्या आहे. मात्र वार्ड क्रमांक तीन मधून सामनगाव ग्रामविकास पॅनलच्या सुशीला दिलीप वागले अनुसूचित जमाती स्त्री या आधीच बिनविरोध झाल्याने सदस्य पदासाठी सध्या बारा उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत ग्रामविकास पॅनल मधून स्वाती साळवे, भूषण घायवटे, गायत्री जगताप, सुनिता जगताप, विमल जगताप, भास्कर जगताप, द्वारकाबाई शिरसाट, चेतन सूर्यवंशी, शीला खरात, नितीन जगताप, दिपाली ढोकणे, नंदू ढोकणे हे उमेदवार आहेत. तर परिवर्तन पॅनल मधून सचिन घायवटे, हेमा घायवटे, मंदा जगताप, संदीप जगताप, रेखा जगताप, मनीषा जगताप, सुधीर पगारे, रजनी गजभिये, शहाबाद कुरेशी, अर्चना सूर्यवंशी, चंद्रकांत जगताप, संगीता ढोकणे हे उमेदवार आहेत तर गोविंद ढोकणे व लक्ष्मण ढोकणे हे दोन्ही अपक्ष उमेदवार ही निवडणूक लढवत आहेत.