Nashik News : राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये मनुस्मृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित वादग्रस्त प्रश्न काढणाऱ्या पेपर सेटवर अखेर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत कारवाई करण्यात आली आहे. संबंधित पेपर सेटरला निष्काशीत केल्याची माहिती विद्यापीठामार्फत देण्यात आली. 


महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने पदवी (Maharashtra Open Univesity) परीक्षेत (BA Exam) राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्र. 2(अ) व प्रश्न क्र.3 (ई) या प्रश्नांवर एआयएसएफने आक्षेप नोंदविला आहे. दरम्यान विद्यापीठाने या प्रश्नामधून संविधान विरोधी मनुस्मृतीचा उद्दातीकरण तसेच छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एआयएसएफने केला आहे. यासंदर्भात विद्यापिठाचे विद्यार्थी सेवा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश देशमुख यांना निवेदन देत राज्यभर आंदोलनाचा इशारा दिला होता.


दरम्यान मुक्त विद्यापीठा मार्फत अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असून या अंतर्गत 12 जुलैला राज्यशास्त्र विषयाचे पेपरमध्ये विचारण्यात आलेल्या दोन प्रश्नांवरून विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्त्व स्पष्ट करा आणि शिवाजी महाराजांच्या राजनीतीला समर्थ रामदासांनी केलेली योगदान सांगा हे प्रश्न विद्यापीठा मार्फत राज्यशास्त्राच्या पेपरमध्ये विचारण्यात आले होते. याबाबत आक्रमक भूमिका घेत छात्र भारती आयएसएफ या संघटनांनी मुक्त विद्यापीठाला जाब विचारात संबंधित प्रकारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. मुक्त विद्यापीठांमध्ये या अभ्यासक्रमाच्या पुस्तकांची होळी ही करण्यात आली होती. 


राज्यशास्र विषयाच्या या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पेपर सेटरवर विद्यापीठा मार्फत कारवाई करण्यात आली असून संबंधित पेपर सेटरला निष्कासित करण्यात आले आहे. यानंतर या पेपर सेटरला मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक कामामध्ये सहभागी करून घेतले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणी महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख म्हणाले की वादग्रस्त प्रश्नांचा विषय समोर येताच विद्यापीठाने तातडीने पावले उचलले आहेत परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पेपर सेटर ची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे भविष्यात कोणाकडूनही अशी चूक होणार नाही याची काळजी ही विद्यापीठामार्फत घेण्यात आली आहे. 


नेमकं प्रकरण काय? 
नाशिक (Nashik) मुक्त विद्यापीठाकडून (Open University) बीए च्या परीक्षेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chatrpati Shiwaji Maharaj) राजनीतीला समर्थ रामदासांनी केलेले योगदान सांगा व मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक महत्व स्पष्ट करा असे प्रश्न विचारण्यात आल्याने नवीन वाद निर्माण झाला होता. नाशिक स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाच्या बीए अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्ष परीक्षेत मनुस्मृती संदर्भातील आणि छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास यांच्या संबंधाविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नावर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन (AISF) या विद्यार्थी संघटनेने आक्षेप नोंदवत निवेदनासह अभ्यासक्रमाची होळी केली होती.