(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Police : 'कोरोनात व्यवसाय गेला, मग चोरी सुरु केली', पोलिसांनी वेषांतर करून टोळी पकडली!
Nashik Police : कोरोना काळात आर्थिक संकट कोसळल्याने थेट वाहने चोरी करण्याचा निर्णय घेतला होता.
Nashik Police : नाशिक (Nashik) शहर परिसरात दुचाकी चोरीच्या (Two Wheelar Theft) वाढत्या घटना रोखण्यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्याच्या (Bhadrakali Police) गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी चक्क वेगवेगळ्या वेशभूषा धारण करून सापळा रचला. यावेळी परिमंडळ एकच्या दुचाकी विरोधी पथकातील अंमलदारांनी संयुक्तपणे दोघा संशयित दुचाकी चोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तब्बल वीस दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीचे सत्र शहरात सुरूच होते. अशातच शहरातील विविध भागातून, वर्दळीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरी केल्या जात होत्या. यातील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सर्वाधिक दुचाकी चोरीच्या घटनांची नोंद होती. यामुळे भद्रकाली पोलिसांनी दुचाकी चोरांना पकडण्यासाठी कंबर कसली होती. वेगवगेळ्या पथकास गस्त घालून संशयास्पद हालचाली टिपण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलिसांनी वेष बदलून गस्त घालत होते. याच दरम्यान त्यांना संशयितांचा सुगावा लागला. अन् दुचाकीचोरांचा शोध लागला.
नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी वेशांतर करून सापळा रचत मूळच्या मालेगावच्या असलेल्या हेमंत सोनवणे या 35 वर्षीय दुचाकी चोराच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून एक दोन नाही तर तब्बल 16 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलिसांच्या तपासात जी माहिती समोर आलीय त्यानूसार आरोपी हेमंतचा हेअर सलूनचा व्यवसाय होता, मात्र कोरोना काळात त्याच्यावर आर्थिक संकट कोसळल्याने त्याने थेट वाहने चोरी करण्याचा निर्णय घेतला होता. नाशिक शहरातील मेनरोडवर पहिली दुचाकी चोरण्यात यश आल्याने दुचाकी चोरी करायच्या आणि बनावट चावी लावत ग्रामीण भागात कमी पैशात त्या विकण्याचा त्याने धंदाच सुरू केला होता. वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना बघता पोलिसांनी मेनरोड भागात सापळा रचला होता. गेली पंधरा दिवस वेषांतर करत दोन पोलीस कर्मचारी चोराचा शोधात असतांनाच हेमंत पोलिसांच्या हाती लागला. त्याने मेनरोड भागातून 6, मुंबई नाक्यावरून एक तर सटाणा गावातून एक दुचाकी चोरी केल्याचं समोर आलं आहे.
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित दुचाकीचोर हबीब हनिफ शहा व हेमंत सोनवणे या दोघांनी वारंवार भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजारपेठांमध्ये व मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्दळीच्या ठिकाणाहून नागरिकांच्या दुचाकी गायब करण्याच्या सपाटा लावला होता. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकातील अंमलदार धनंजय हासे, सागर निकुंभ यांनी वेगवेगळ्या पद्धतीने वेषांतर करून वर्दळीच्या परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना संबंधित परिसरात संशयास्पद हालचाली दिसून आल्या.
दरम्यान पोलिसांचा संशय बळावल्यामुळे त्यांनी त्यास ताब्यात चौकशी केली. यावेळी संशयिताने 8 लाख पाच हजार रुपयांच्या 16 दुचाकी चोरून नेल्याचे समोर आले. या संशयितांनी शहरातील विविध भागातून या दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तदनंतर संशयितांकडून चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्याची माहिती उपायुक्त किरणकुमार यांनी दिली.संशयितांने अद्यापपर्यंत 16 दुचाकींची चोरी केल्याची कबुली दिली. यात सर्वाधिक आठ दुचाकींची चोरी ही भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून केल्याचे निष्पन्न झाले.
वेगवगेळ्या टोळ्या सक्रिय
नाशिक शहरासह नाशिकरोड, इंदिरानगर, सातपूर, नाशिक ग्रामीण या ठिकाणाहून दुचाकी गाडी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील काही महिन्यांत अनेक गुन्हे उकल झाले आहेत. दरम्यान सद्यस्थितीत भद्रकाली पोलिसांनी दोघं संशयितांना दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे, मात्र शहरात अनेक भागात चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यामुळे शहरात दुचाकी चोरांच्या टोळ्या शहरात पसरल्याचे यावरून दिसून येते. मात्र भद्रकाली पोलिसांप्रमाणे शक्कल लढवून चोरीच्या घटना प्रतिबंध घालता येईल, असे समजते.