Nashik News : नाशिक (Nashik) शहर परिसरात ड्रोन उड्डाणावरील (Drone Fly) बंदी पोलीस आयुक्तालयाने (Nashik Police) पुढे कायम ठेवली आहे. मागील पंधरा दिवसांपासून असा आदेश होता, मात्र आदेशाची मुदत संपल्याने पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी 30 ऑक्टोबर पर्यंत वाढवली असून याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ड्रोन चालकही वैतागले असून ड्रोन उडवला कोणी? आणि शिक्षा कोणाला? असा सवाल नाशिक शहरातील ड्रोन चालक, ऑपरेटर करत आहेत.
नाशिकमध्ये (Nashik) लष्करी हद्दीत एक महिन्यात दोनवेळा ड्रोन (Drone) उडाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. यानंतर संरक्षण विभागासह गृह विभागाकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी देखील नाशिक शहर परिसरात नो ड्रोन फ्लायझोन निश्चित करत ड्रोन उडवण्यावर बंदी घातली. त्याचबरोबर शहरातील ड्रोन मालक, चालकी यांच्याकडून माहिती मागविण्यात आली. त्या सर्वांचे ड्रोन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. असा आदेशच काढल्याने सर्वच ड्रोन चालकांचे धाबे दणाणले. मात्र या निर्णयामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रोन चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. दरम्यान सद्यस्थितीत नाशिक पोलिसांकडे 17 ड्रोन असून उड्डाणावरील निर्बंधात वाढ करण्यात आली असून ड्रोन चालक मालकांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहे.
दरम्यान नाशिक शहरातील भारत सरकारच्या संरक्षण खात्याच्या अधिपत्याखाली विविध अति महत्त्वाच्या लष्करी आस्थापनांसह अन्य संवेदनशील आस्थापना नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहेत. मागील महिन्यात दोनआस्थापनांमध्ये अज्ञात ड्रोनची घुसखोरी झाल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी निदर्शनास आला होता. त्यानंतर नाशिक पोलीस सतर्क झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरातील ड्रोन जमा करण्यात आले असून आतापर्यंत एकूण 17 ड्रोन जप्त केले आहेत. या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात काढलेले आदेशात ड्रोन चालक, मालक, ऑपरेटर यांना इशारा देत त्यांचे ड्रोन पोलीस ठाण्यात जमा करण्याचे फर्मान सोडण्यात आले. दोन मालक चालक व ऑपरेटर यांना कोणत्याही कार्यक्रमाकरिता ड्रोन छायाचित्रीकरण करावयाचे असल्यास ड्रोन वापरण्याची पूर्व परवानगी घ्यावी. ही परवानगी संबंधित पोलीस ठाण्यात दाखवून जमा केलेल्या दोन तासापुरता स्वरूपात घ्यावा, कार्यक्रमाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर ड्रोन पुन्हा पोलीस ठाण्यात आणून जमा करावा असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
गुन्हा कोणाचा शिक्षा कोणाला?
दरम्यान नाशिक शहरातील अति संवेदनशील समजल्या जाणाऱ्या डीआरडीओ व लष्करी हद्दीत ड्रोन उडविल्याची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी सतर्क होत शहरात द्रोण वापरणाऱ्यांची माहिती मागवून ड्रोन जमा करण्यात आले. त्याचबरोबर नवा आदेशही काढण्यात आला. त्यानुसार शहरातील 17 ड्रोन मागील पंधरा दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र यामुळे ड्रोन चालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न पुढे आला असून अनेकांचा उदर निर्वाह त्याच्यावर चालत असल्याने ड्रोन चालकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. अशातच ड्रोन ची परवानगी घ्या, दोन तासासाठीच वापरा, त्यासाठी पैसे भरून सुरक्षेसाठी एक पोलीस घेऊन जा, पुन्हा ड्रोन जमा करा, अशी प्रक्रियाच ड्रोन चालकांना करावी लागत आहे. त्यामुळे 'आमचेच ड्रोन, आम्हालाच त्रास' असा सवाल ड्रोन चालकांनी उपस्थित केला आहे.