Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात क्राईम रेट (Crime) दिवसेंदिवस वाढत असून नाशिक पुन्हा एकदा एका अत्याचाराच्या घटनेने हादरला आहे. एका अल्पवयीन परिचारिकेवर डॉक्टरने (Doctor) अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या अंबड परिसरात ही घटना घडली आहे.


नाशिक शहरासह जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या (Molestation) घटना दिवसेंदिवस घडत आहेत. अशातच आता शहरातील एका डॉक्टरचा कारनामा समोर आला आहे. रुग्णालयात काम करणाऱ्या एका अल्पवयीन परिचारिकेवरच डॉक्टरने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. रुग्णालयात एकटे असल्याची संधी साधत डॉक्टरनेच अल्पवयीन परिचारिका अत्याचार केला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. संशयित डॉक्टरांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे.


नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी रुग्णालयात ही घटना घडली आहे. संशयित डॉक्टर उल्हास कुटे शनिवारी रात्री साडेदहा वाजता सुमारास त्यांच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये गेला. यावेळी हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी परिचारिका म्हणून काम पाहणारी  सोळा वर्षीय परीचारिकेस डॉक्टरने बोलावले. परिचारिका रूममध्ये एकटी असल्याचे निमित्त साधून हातपाय दुखत असल्याच्या निमित्ताने तिच्या रूमच्या आत प्रवेश करीत दरवाजाची कडी लावून लावली. यानंतर डॉक्टर कुटे यांनी पीडित परिचारिकेवर जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केला. यानंतर झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास पीडितेला कामावरून काढून टाकण्याची धमकी डॉक्टरकडून देण्यात आली होती, मात्र या धमकीला न जुमानता पिडीत परिचारिकेने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत हकीकत सांगितली.


याप्रकरणी संशयित डॉक्टर उल्हास कुठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख, महिला उपनिरीक्षक सोनल फडोळ यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे.


नाशिकमध्ये अत्याचार वाढता वाढे..!
नाशिक शहर परिसरात मागील काही दिवसांचा आढावा घेतला तर लक्षात येईल कि, शहरात एका दिवसाला एक अत्याचाराची घटना घडत आहेत. दरम्यान नाशिक शहरात दररोज महिला अत्याचाराच्या एक किंवा दोन घटना घटना उघडकीस येत आहेत. यामध्ये विनयभंग, अत्याचार, मारहाणीच्या घटना घडत आहेत. एकीकडे महिला सक्षमी करणासाठी सरकार वेगवगेळ्या उपाययोजना राबवित असताना महिला, मुलींवर अत्याचार काही थांबायचे नाव घेत नाही. नाशिक शहर परिसरात कुठे न कुठे महिला अत्याचाराची घटना उघडकीस येत आहे. यावर पोलीसही कारवाई करीत आहेत. मात्र तरीदेखील पोलिसांना न जुमानता अत्याचारांच्या घटनांत वाढ सुरूच आहे.