Nashik News : एकीकडे शहरं स्मार्ट होत आहेत, सत्तेसाठी हपापलेले राजकारणी काय झाडी काय डोंगार, काय हाटीलमध्ये व्यस्त आहेत, दुसरीकडं मात्र ज्यांच्या मतदानावर नगरसेवक, आमदार होतात, त्याच मतदारांना मात्र मरण यातना भोगाव्या लागत आहेत.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा (Surgana) तालुक्यातील वाघधोंड ग्रामपंचायत मधील साबरदरा येथे स्मशानभूमी अभावी भरपावसात एका मृतदेहाची चिता पेटण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे. एकीकडे शहरात मशीनच्या वापराने एका बटनावर प्रेताची व्हिलेवाट लावली जाते, मात्र गावखेड्यात अजूनही स्मशानभूमीच नसल्याने किती मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे विदारक चित्र या घटनेवरून लक्षात येते.
वाघधोंड ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या साबरदरा वाडीची लोकसंख्या साधारणात 1000 च्या आसपास आहे. 200 घरांचा येथे उंबरठा आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने मृतदेहाची मोठी हेळसांड होत आहे. येथे स्मशानभूमी नसल्याने येथील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी वणवण भटकावे लागत आहे. साबरदरा येथे 08 जुलै रोजी एका वयोवृद्ध महिलेचे आकस्मिक निधन झाले. दरम्यान सकाळपासूनच संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी शेड नसल्याने कुटुंबाने शेतातच अंत्यविधी उरकण्याचा निर्णय घेतला. साबरदरा येथील स्मशानभूमी कहांडोळचोंड शेजारी कासूटन्याचा कुंड येथे असून तेथे जाण्यासाठी अद्यापही रस्ता नसल्याने विशेषतः पावसाळ्यात खुपच हाल अपेष्टा सहन करावा लागत आहेत.
यावेळी अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा असा प्रश्न नागरिकांना पडला. यावेळी पाऊस कमी झाल्यावर तातडीने ग्रामस्थांनी चितेला अग्नी दिला. एकूणच मरणानंतर मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.
आजही आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजून ही स्मशानभूमीसाठी प्रतिक्षा करावी लागतेय हे न उलगडणारे कोडे आहे. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमीपर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात. शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात.
मयत झालेल्या आजीचे नातू वसंत भोये म्हणाले, वाघधोंड ग्रामपंचायत मध्ये साबरदरा व बंधारपाडा हि गावे आहेत. पैकी साबरदरा येथे स्मशानभूमी शेड उभारलेले नाही. त्यामुळे विशेषत पावसाळ्यात आक्समिक निधन झाले तर सरण रचलायला खुप अडचणी निर्माण होतात. शेड नसल्याने आम्हांला नाईलाजाने शेतातच अंत्यविधी उरकावा लागतो. एखाद्या योजनेतून स्मशानभूमी शेड उभारून दिल्यास सोयीचे होईल.