Nashik Hanuman Birth Place : नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित शास्रार्थ सभेत गोंधळ पाहायला मिळाला. सभेच्या ठिकाणी दोन्ही साधू महाराजांकडून बसण्यावरून मानापमान नाट्य रंगले. त्यामुळे सभेचा मुद्दा बाजूलाच राहून बसण्याचा वादामुळे काही काळ गोंधळ झाला. नाशिकरोड येथे शास्त्रार्थ सभेच्या सुरवातीलाच गोविंदानंद महाराज आणि नाशिकच्या साधू महंतांमध्ये मध्ये वाद झाला. गोविंदानंद महाराज हे खुर्चीवर बसल्याने वाद झाला त्यानंतर नाशिकचे साधू महंतांनी आमच्यासोबत खाली बसून चर्चा करण्याची मागणी केली.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबतचा वाद चांगलाच पेटला आहे. हा वाद सोडविण्यासाठी आज नाशिकरोड येथे शास्रार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सभेपूर्वी सभास्थळी बसण्यावरून साधू महंतांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले. त्यामुळे कोण कुठे बसणार या वादात हनुमान जन्मस्थळाचा वाद बाजूलाच राहिला. मात्र तासभराच्या व्यत्ययानंतर आता पुन्हा एकदा शास्रार्थ सभेला सुरवात झाली असून अनेक विद्वान साधू महाराजांचे आगमन सभास्थळी होत आहे.
कर्नाटक येथील किष्किंदा नगरीचे गोविंदानंद सरस्वती महाराज यांच्या अंजनेरी हनुमान जन्मस्थळ नसल्याचा दाव्यानंतर हा वाद पेटला आहे. गोविदानंद महाराजांनी याबाबत नाशिकच्या साधू महंतांना जन्मस्थळ सिद्ध करण्या संदर्भात खुले आव्हानही दिले. या आव्हानचा स्वीकार करीत नाशिकच्या साधू महंतांसह गावकरी एकत्र झाले. तसेच या संदर्भात रास्ता रोकोही केला. त्यानंतर आज नाशिकरोड येथे याबाबत महाचर्चेला सर्वजण सहभागी झाले आहेत.
धर्मग्रंथांचा संदर्भ
दरम्यान सुरवातीला झालेल्या वादानंतर सर्व साधू महंत एक एक करत दाखल झाले झाले असून यामध्ये अयोध्येचे प्रधानाचार्य पाठक, गोविंद आनंद सरस्वती, नाशिकचे अनिकेत शास्त्री यांसह अनेक पक्षांचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित आहेत. आणि याच ठिकाणी संपूर्ण सभा सुरु आहे. सभास्थळी विविध धर्मग्रंथ असून या धर्मग्रंथांच्या माध्यमातून हनुमान जन्मस्थळाचा वाद सोडविला जाणार आहे. यामध्ये ब्रम्हांडपुराण, महाभारत, रामायण, शिवपुराण असे धर्मग्रस्थांच्या संदर्भ घेतला जात आहे.
रामजन्मभूमी चे प्रधानाचार्य पाठक म्हणाले की, सनातन परंपरेत अनेक वाद विवाद आहेत, काही विवाद कायदेशीर आहेत तर काही बनावट आहेत. हे संपुष्टात यायला हवं. आम्ही या चर्चेला उपस्थित आहोत, त्यामुळे जिंकणे किंवा हारणे महत्वाचे नाही. एखाद्या गोष्टींचे प्रमाण देण्यासाठी कुणा बाबा, महाराजाने काय सांगितले हे महत्वाचे नाही तर शास्त्र काय सांगतंय हे महत्वाचे आहे. वाल्मिकी रामायण नुसार हनुमानाचा जन्म हा किष्किंदा नगरी येथे आहे, त्यामुळे चर्चा व्हायलाच पाहिजे.