Nashik Shivsena : नाशिकमध्ये शिंदे आणि ठाकरे गटात चांगलाच कलगीतुरा पाहायला मिळत असून संजय राऊतांच्या दौऱ्यानंतर शिंदे गटाने पत्रकार परिषद घेत त्यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर आता ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर यांनी यांनी अजय बोरस्ते यांच्यावर निशाणा साधत घोडं, मैदान फार लांब नाही, लवकरच समजेलच' असा थेट इशारा शिंदे गटाला दिला आहे.
संजय राऊत शनिवारी, रविवारी नाशिकमध्ये हिशेब घेण्यासाठी येत असल्याचा आरोप करताना, आपण दहा वर्षे पक्षात होता आणि मुख्य पदावर होता, त्यामुळे आपण किती पैसे दिले, घेतले याचे स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी अजय बोरस्ते यांना दिले आहे. नेत्यांनी जर पैसे घेतले असते, तर आपणही पाच वर्षे त्या पदावर राहू शकला नसता. कारण पैसे देणारे खूप तयार असतात, निष्ठेने काम करणारे कमी असतात, असा टोलाही बडगुजर यांनी लगावला. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना पालापाचोळा, गद्दार म्हणून संबोधले होते. त्यावर शिंदे गटाच्या आरोपाला बडगुजर यांनी प्रत्युत्तर दिले. ते पुढे म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यामध्ये केलेले आरोप बोरस्तेंच्या जिव्हारी लागलेले दिसतात.
संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना 'अजय बोरस्ते यांच्या पक्ष प्रवेशावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की हा चायनीज माल आहे, जास्त काळ आपल्या पक्षात टिकणार नाही, असे पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्याचा अजय बोरस्तेंना फार राग आला आणि त्या भावनेतून त्यांनी संजय राऊत यांच्यावर बेछूट, बिनबुडाचे आरोप केले असून, त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही. राजकारणाची पातळी घालवू नये, असा सल्ला देतानाच बडगुजर यांनी, आपण ज्या पक्षात गेला, त्या पक्षात निष्ठेने काम करा, शिवसेना नेते व शिवसैनिकांना डिवचू नका. निवडणुकीत 'किस मे कितना दम है समजेलच, घोडं, मैदान फार लांब नाही, असा इशाराही सुधाकर बडगुजर यांनी दिला.
काही वर्ष तुम्ही सोबत होतात...
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट (Shinde Sena) आणि ठाकरे गटात जोरदार रणकंदन सुरु आहे. अशातच नुकताच नाशिक (Nashik) दौऱ्यावर येऊन गेलेल्या संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने आज पत्रकार परिषद घेत जोरदार हल्ला चढवला. यावेळी शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर आगपाखड केली. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांनी देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. अजय बोरस्ते पाच वर्षे विरोधी पक्षनेते असताना, संजय राऊत यांचे बगलबच्चे होते. त्यांच्यासोबत उठणे-बसणे नेहमी होते. मात्र आज अचानक त्यांना राऊत वाईट दिसायला लागले असून, पात्रता नसताना सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला, तर ते परत तोंडावरच पडतील असा इशाराही दिला.