Continues below advertisement


नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यापक्षाच्यावतीने शेतकऱ्यांच्या (Farmer) मागण्यांसाठी नाशिकमध्ये (Nashik) भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे (NCP) नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात आणि खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक आमदार आणि सर्व खासदार, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला हमी भाव आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात विदर्भस्टाईलमुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या कराळे मास्तरांनीही (Karale master) जोरदार भाषण केलं. गांधी लढे थो गोरों से, हम लढेंगे चोरों... असे अशी घोषणाबाजी करत शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे, सरकारने कर्जमाफीचे आश्वासन पाळलेच पाहिजे, असे त्यांनी म्हटले.


गळ्यात फळभाज्यांचा हार, डोक्यावर गांधी टोपी घालून कराळे मास्तरांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली होती. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते जंयत पाटील यांच्यानंतर कराळे मास्तरांना भाषणाची संधी देण्यात आली होती. या संधीचे सोन करत कराळे मास्तरांनी राज्यातील देवाभाऊ सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोदी सरकारने कापसावर निर्यातबंदी लावल्याने कापसाचा भाव कमी झाला आहे. राज्यात सरकारचा हमीभाव 8 हजार असताना, कापूसाचा बाजारभाव 6 हजारांवर येऊन ठेपल्याचे कराळे यांनी म्हटलं. तसेच, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, पण या संतांच्या भूमीत देवाभाऊंनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन पाळलं नाही, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्‍यांनी पाळले नाही, असे म्हणत हे चोरांचे सरकार असल्याचे म्हटले. तसेच, गांधी लढे ते गोरों से, हम लढेंगे चोरों से.. अशी घोषणाबाजीही कराळे मास्तरांनी केली.


साहेब खडे तो, सरकार से बडे


नाशिकमध्ये आपला एक खासदार आहे, इथे राष्ट्रवादीचा आमदार नाही तरीही मोठा जनसागर आला आहे. सरकारने 7/12 कोरा करण्याचे आश्वासन दिले, पण सातबारा कोरा झाला नाही. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा तळतळाट आहे, म्हणूनच एकही कृषिमंत्री स्थीर नाही. साहेब खडे तो सरकार से बडे, असे म्हणत शशिकांत शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला.


मंत्र्‍यांना रस्त्यावर फिरू देणार नाही


राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषण करताना शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलंय. आजच्या मोर्चानंतर प्रत्येक जिल्ह्यात सरकारला शांततेत निवेदन द्या, जिल्हाधिकारी यांच्याकडे कर्जमाफीसाठी निवेदन द्या. सरकारकडे 7/12 कोरा करण्याची मागणी करा, जर 1 महिन्यात जर सरकारने आश्वासन पाळले नाही तर सरकारला खाली खेचू, मंत्र्‍यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशा शब्दात खासदार सुळे यांनी देवाभाऊंच्या सरकारला इशारा दिला आहे.



हेही वाचा


बीडमध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा, आंदोलक रस्त्यावर; ST प्रवर्गातील मागणीला खासदारांसह 6 आमदारांचा पाठिंबा