Guillain Barre Syndrome :महाराष्ट्रात गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) नावाचा दुर्मिळ पण गंभीर आजार वेगाने पसरत आहे. राज्यात आतापर्यंत 225 हून अधिक जणांना या आजाराची लागण झाली आहे. या आजारामुळे आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागांमध्ये या आजाराचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तर आता नाशिक शहरात देखील जीबीएसचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. जीबीएस रुग्णाची प्रकृती गंभीर असून रुग्णावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शहरात जीबीएस रुग्ण आढळून आल्याने नाशिक जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे.

याबाबत सिव्हिल सर्जन चारुदत्त शिंदे यांनी म्हटलंय की, नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील साठ वर्षीय व्यक्तीला जीबीएस आजाराची लागण झाली आहे. त्यांनी याआधी खाजगी रुग्णालयात उपचार घेतलेले आहेत. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आता सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिककरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, बाहेरचे खाणे टाळावे, अशुद्ध पाणी पिणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

'जीबीएस' आजार नेमका काय? 

गुलेन बॅरी सिंड्रोममध्ये बाहेरील विषाणू किंवा जिवाणूंवर हल्ला करणारी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीच मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे मेंदूकडून शरीरातील इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात, असे या आजाराचे स्वरूप आहे. स्नायू कमकुवत होऊ शकतात. हाता-पायातील संवेदना कमी होऊ शकते. गिळताना किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. प्रौढांमध्ये आणि पुरुषांमध्ये ही समस्या अधिक असून, सर्वच वयोगटांतील लोकांना याचा त्रास होऊ शकतो. 

'जीबीएस'ची लक्षणे काय?

  • बरा न होणारा ताप, सर्दी, खोकला,
  • सातत्याने अशक्तपणा,
  • हात, पाय, चेहऱ्यावरील स्नायूंना अर्धांगवायूचा झटका येणे,
  • छातीमध्ये प्रादुर्भाव होऊन श्वास घेण्यास त्रास होणे,
  • बोलण्यासह अन्न गिळण्याचा त्रास होणे,
  • रक्तसंसर्ग होऊन फुफ्फुसात गुठळ्या अन् हृदयविकाराचा झटका येणे,
  • न्यूरोलॉजिकल गुंतागुंतीत वाढ,
  • जास्त दिवस डायरियाचा त्रास होणे, 

काळजी कशी घ्याल? 

  • पाणी उकळून व गाळून प्यावे.
  • उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
  • अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

आणखी वाचा 

Nashik Crime : नाशिकमध्ये कोयते, लाठ्याकाठ्या अन् लोखंडी रॉडनं वार करून एकाला संपवलं; पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, आरोपींना बेड्या