Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Nashik Lok Sabha Election 2024 : भगूर येथे महाविकास आघाडीच्या रॅलीत दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे दिसून आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Constituency) 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) नाशिकमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. आज महाविकास आघाडीच्या रॅली दरम्यान शिवसेनेचे (Shiv Sena) दोन्ही गट आमनेसामने आल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली होती.
निवडणुकी पूर्वी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केलेल्या विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांच्या भगूर शहरात महाविकास आघाडीकडून रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसून आली. ही रॅली सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shiv Sena Shinde Group) पदाधिकारी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी (Shivsena UBT) आमनेसामने आले.
भगूरमध्ये सेनेचे दोन्ही गट आमनेसामने
विजय करंजकर हे ठाकरे गटातून नुकतेच शिवसेना शिंदे गटात दाखल झाले आहे. विजय करंजकर यांचे भगूरमध्ये वर्चस्व आहे. भगूर गावातील रॅली दरम्यान दोन्ही शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये घोषणायुद्ध झाल्याचे दिसून आले. दोन्ही गट आमनेसामने आल्यानं पोलिसांची धावपळ उडाली होती. पोलिसांनी मध्यस्थी यात वाद झाला नाही.
राजाभाऊंना भगूरमधून मोठे मताधिक्य मिळणार - सुधाकर बडगुजर
याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख म्हणाले की, आज ठाकरे गटाची प्रचंड मोठी रॅली होती. शिंदे गटाचे केवळ तीन लोक होते. शिवसेना ही आक्रमक आहे. ज्या प्रमाणे भगूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मानणारा वर्ग आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेला मानणारा वर्ग आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना निश्चितच भगूरमधून मोठे मताधिक्य मिळेल, असे त्यांनी यावेळी म्हटले.
रॅली काढून प्रचाराची सांगता - राजाभाऊ वाजे
महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे म्हणाले की, अनेक दिवसांपासून मतदारसंघात प्रचार करतोय. मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत असून शहरी व ग्रामीण असा हा मतदारसंघ असल्याने वेगवेगळे प्रश्न आहेत. माझी उमेदवारी लवकर जाहीर झाल्याने त्याचा मला प्रचार करण्यासाठी अधिक फायदा झाला. भगूर शहरात आजची रॅली म्हणजे शक्ती प्रदर्शन नव्हे तर या गावात प्रचार राहिला होता म्हणून या ठिकाणी रॅली काढून सांगता करतोय, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
आणखी वाचा























