Dindori Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (दि. 20) मतदान पार पडणार आहे. निवडणुकीसाठी गेल्या महिन्याभरापासून दिंडोरीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार करण्यात आला. शनिवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. महायुतीकडून डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) तर महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) निवडणुकीच्या रिंगणात आहे. हा मतदारसंघ देशात सर्वाधिक कांदा आणि द्राक्ष पिकवणारा लोकसभा मतदारसंघ आहे. यंदाच्या निवडणुकीत कांद्याचा (Onion) प्रश्न चांगलाच गाजला आहे. आता केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांनी मतदारांना मोठी गॅरंटी दिली आहे. 


नाशिक जिल्ह्यातील कांदा प्रश्न देशपातळीवर चांगलाच चर्चेत आला. कांद्याचे दर, कांद्यावरील निर्यातबंदी यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न केला. जिल्ह्यात झालेल्या विविध सभांमधून देखील विरोधकांनी कांदा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महायुतीच्या उमेदवारांसाठी निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे पंतप्रधान मोदी यांच्या सभेत देखील एका शेतकऱ्याने पंतप्रधान मोदींच्या भाषणावेळी 'कांद्यावर बोला' असे म्हणत जोरदार घोषणाबाजी केली होती. 


मी निवडून आल्यास कांदा प्रश्न पीएम मोदींकडून हक्काने सोडवणार : डॉ. भारती पवार 


यामुळे दिंडोरी लोकसभेची निवडणूक कांदा प्रश्नाभोवती केंद्रित झाल्याचे दिसून येत आहे. ही लढत आता अटीतटीच्या वळणावर येऊन पोहचली आहे. उद्या दिंडोरीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, 'मी निवडून आल्यास कांदा प्रश्न हक्काने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोडवून घेईल', अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे. 'देश हितासाठी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून उद्या मतदान करावे', असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. 


कांदा प्रश्नी काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? 


पिंपळगाव बसवंत येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना एका तरुण शेतकऱ्याने जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कांदा प्रश्नी वक्तव्य केले. ते म्हणाले की, कांदा स्टॉक करण्याचे काम आम्ही सुरू केले. 60 हजार मेट्रिक टन कांदा आम्ही खरेदी केला. आता 5 लाख मेट्रिक टन कांदा आम्ही पुन्हा स्टॉक करणार आहोत. 35 टक्के कांदा निर्यात आमच्या काळात वाढला आहे. निर्यातीसाठी आम्ही अनुदान देखील दिले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. 


आणखी वाचा 


Nitin Gadkari : 'माकडाच्या हातात कोलीत देण्यापेक्षा मतदार सुज्ञ; नितीन गडकरींचा इंडिया आघाडीला टोला