Chhagan Bhujbal नाशिक : माझे देव शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज हेच आहे. कुणी मला स्वातंत्र्य दिलं, कुणी मला आरक्षण दिलं. आता अलीकडे फार अडचणीचा काळ आहे, ओबीसींच्या (OBC) दृष्टीने फार अडचणीचं आहे. आमचं म्हणणं आहे, की ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवा आणि मराठा समाजाला आरक्षण (Reservation) द्या. पण काहींचं म्हणणं यातच द्या असे आहे. अरे पण आयोगाने हे नाकारलं आहे. ही लढाई एका नाही ३७४ लहान-लहान जातींची आहे, असे वक्तव्य राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिकमध्ये (Nashik News) केले. 


भुजबळ पुढे म्हणाले की, आरक्षण मिळालं म्हणजे नोकरी मिळेलच असं नाही. आरक्षण हा 'गरिबी हटाव' कार्यक्रम नाही. सत्यशोधक या सिनेमात अनेक गोष्टी या परिणामकारक मांडल्या आहे. पण आपल्याला वेळ कुठंय? आपण डंकी फंकी काहीतरी बघत असतो, असे ते म्हणाले. 


वेगळं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न


मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मराठा समाजाच्या मोर्चाबाबत भुजबळ म्हणाले की,  लोकशाहीत मोर्चा हा अधिकार आहे. आम्ही एका जातीसाठी लढत नाही. आरक्षण संपवण्याचा घाट कुणी घालत असेल, तर ते वाचवण्याचा प्रयत्न सरकार आणि बाहेरच्या लोकांनी देखील केला पाहिजे. वेगळं आरक्षण देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. पण काही लोकं अडचण निर्माण करत आहे. बीडमधील प्रकार हा झुंडशाही आहे. या झुंडशाही पुढे सरकार, न्यायालय यांनी वाकू नये. धमकी देणे हे लोकशाहीत अभिप्रेत नाही, असे ते म्हणाले. 


सर्व मंत्रिमंडळ अयोध्येला जाणार


अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्याविषयी भुजबळ म्हणाले की, अनेक वर्षांचा हा लढा होता. त्या लढ्यात अनेक लोकांचे बलिदान गेले.देशभर याचा उत्साह, प्रेम आहे. काही लोकं टीका करतात. प्रत्येकाचं मत आहे. पण श्रेय घेण्याचे प्रयत्न होत असतात.भाजपा, विश्व हिंदू परिषद याचे श्रेय घेईल. गर्दी कमी झाल्यावर सर्व मंत्रिमंडळ अयोध्येला जाईल. सगळीकडे मंदिराची सफाई हा चांगला उपक्रम आहे. त्यामुळे अनेक मंदिरे साफ झाली, असे भुजबळ म्हणाले. 


अनेक मुख्यमंत्र्यांना आमंत्रण नाही


मराठा मोर्चामुळे मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौरा रद्द केला का? असे विचारले असता भुजबळ म्हणाले की, नाही, ते काही खरं नाही. अनेक मुख्यमंत्र्यांना देखील राम मंदिर लोकार्पणाचे आमंत्रण देण्यात आलेले नाही.


अतिशय चांगलं आवाहन


मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले की, अतिशय चांगलं आवाहन आहे. बाबरी मस्जिद पाडल्यानंतर दंगल झाली. आता जे झालं, ते झालं. मंदिर होत आहे, मस्जिदसाठी देखील जागा दिली आहे, त्यांचं काम ते करतील, असे यावेळी त्यांनी म्हटले.


मी काही नास्तिक नाही - छगन भुजबळ


तुम्ही उद्या मंदिरात जाणार का? असे विचारले असता भुजबळ म्हणाले की, मी काही नास्तिक नाही. मी पंढरपूरला जाऊन आलो. मी शिवसेनेत असताना, रथाला परवानगी नसताना मी रथ काढला होता. 


आणखी वाचा


Uddhav Thackeray : नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची सभा, राज्यस्तरीय अधिवेशन, काळाराम मंदिर दर्शन, तयारी कुठपर्यंत?