Chhagan Bhujbal : नाशिकचे चार पोलीस (Nashik Police) कर्मचारी वेगवेगळ्या गुन्ह्यांतील दोन आरोपींसोबत एका हॉटेलमध्ये पार्टी करत होते. ही माहिती नाशिक पोलीस आयुक्तांकडे पोहोचल्यावर त्यांनी विशेष पथक तयार करून पोलिसांवर तातडीने कारवाई केली. दोन आरोपींना न्यायालयीन कामकाजासाठी नाशिक जिल्हा न्यायालयात (Court) आणण्यात आले होते. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपींना सेंट्रल जेलकडे घेऊन जाण्याऐवजी, संबंधित पोलीस कर्मचारी पुणे रोडवरील एका हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत पार्टी करत होते. याबाबतची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनी ‘युनिट एक’ या विशेष पथकाला कारवाईसाठी पाठवले. पथकाने हॉटेलवर छापा टाकत चारही पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत या कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली. आता यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, कुठे लांब गेले असतील आणि जेवणाची वेळ असेल तर त्यांना गाडीमध्येच आणून खायला दिले पाहिजे. कैद्याला उपाशी तर ठेवता येणार नाही. मी काही त्याचा पाठिंबा देत नाही. पण पार्टी करणं, तिकडे जाऊन बसणं धाब्यावर वगैरे... त्यापेक्षा दोन फूट्स आणून द्या आणि तिकडे लवकर पोहोचा, असं करून त्यांना ठेवायला पाहिजे होतं. पण अशा गोष्टी अनेक वेळा होतात आणि झालेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच पोलिसांची बदनामी होते. त्यांना सस्पेंड सुद्धा केले आहे, असे त्यांनी म्हटले.
ताबडतोब पंचनामे केले पाहिजे
दरम्यान, नाशिक जिल्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यामध्ये येवल्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झालाय. त्यामुळे फार मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षाचे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा पिकवणाऱ्या गरीब शेतकऱ्यांचे कांदे वाहून गेले. हा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी होतो. त्यामुळे मी अगोदरच कलेक्टरला सांगितले आहे. पंचनामे करायला सुरुवात करा. काहीतरी तुम्हाला मदत करावीच लागेल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व मंत्र्यांना कल्पना आहे की महाराष्ट्रात काय चाललंय. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज नाशिक जिल्ह्यात आहे. लोक त्यांना भेटणारच आहेत. ताबडतोब पंचनामे केले पाहिजे. कारण आठ दिवसानंतर त्यांना तेथे काही सापडणार नाही. मी एमएसईबीच्या लोकांना सांगितले की, तुमच्या खात्याच्या लोकांना सांगा, सगळीकडे चक्कर मारा. कुठे खांब कोसळले आहे ते पाहा, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
