नाशिक : वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांच्या ओम प्रतिष्ठानच्या (Om Pratishthan) वतीने हिंदुंची धार्मिक स्थळे व तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी प्रसादाचे पावित्र्य राहण्यासाठी त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे प्रसाद विक्रेत्यांना 'ओम प्रमाणपत्र' (Om Certificate) वाटण्यात आले. या संस्थेच्या वतीने भाविकांना भेसळ नसलेला व शुध्द पदार्थांनी तयार केलेल्या प्रसादाचे वाटप अथवा विक्री होईल याची कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. प्रसाद विक्रेते अथवा वाटपकर्ते यांना हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. रणजीत सावरकर, अभिनेते शरद पोंक्षे, महामंडलेश्वर अनिकेत शास्त्री देशपांडे आदींच्या उपस्थितीत या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. याबाबत आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Andhashraddha Nirmulan Samiti) आक्षेप घेतला आहे.
त्र्यंबकेश्वर येथील मंदिरामध्ये भाविकांकडून त्यांच्या श्रद्धास्थानाला जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार अनेकदा घडतात. त्यामुळे हिंदू धर्मियांच्या आस्थेला ठेच लागत असून प्रसादाचे पावित्र्यही अशुद्ध होत आहे. हे पावित्र्य भंग होऊ नये म्हणून प्रसाद विकणाऱ्या दुकानांना काही हिंदुत्ववादी संघटनांकडून ओम सर्टिफिकेट दिले गेले. दैवताला अर्पण केला जाणारा प्रसाद सात्विक आहे की नाही याची तपासणी आता केली जाणार आहे. मात्र प्रसादाचे शुद्धीकरण की धार्मिकतेच्या नावाखाली सामाजिक विद्वेषीकरण? असा सवाल अंनिसने उपस्थित केला आहे.
व्यावसायिकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासारखा प्रकार
त्र्यंबकेश्वर हे अनेक धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. शिवाय सर्वच धार्मिक क्षेत्रांप्रमाणे येथेही धार्मिक क्षेत्राशी निगडित अनेक वस्तूंचा, खाद्यपदार्थांचा व्यवसाय, व्यापार करणारी मंडळी ही विविध जाती, धर्माची आहेत. म्हणून विधर्मी व्यक्तीने मंदिराबाहेर प्रसादात भेसळ करण्याचे प्रकार घडले आहेत, असे भंपक विधान करून सर्वच भाविक व व्यावसायिकांच्या मनात संशय व संभ्रम निर्माण करण्यासारखा प्रकार असल्याचेही अंनिसने म्हटले आहे.
बहाणा करून बेकायदेशीरपणे सर्टिफिकेट वाटण्याची चळवळ
लोकांच्या सुदृढ आरोग्यासाठी शासनाच्या अन्नभेसळ प्रतिबंध व अन्नसुरक्षा विभागामार्फत नियमितपणे केवळ प्रसादच नव्हे तर सर्वच अन्नपदार्थांची काटेकोर तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या या विभागाने सतत जागरूक राहून सर्वच धर्मांच्या धार्मिक स्थळांवरील प्रसादासह सर्व ठिकाणी असलेल्या अन्नधान्य, वस्तू ,पदार्थांची वारंवार तपासणी करायला हवी आणि दोषींवर कडक कायदेशीर करायला हवी, अशी मागणी या हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारकडे किंवा अन्नभेसळ प्रतिबंध व अन्नसुरक्षा विभागाकडे लेखी स्वरूपात करायला हवी होती. पण तसे काहीही न करता धार्मिकतेच्या नावाखाली प्रसाद शुद्धीकरणाचा बहाणा करून बेकायदेशीरपणे व मनमानीप्रमाणे प्रसादाच्या शुद्धीकरणाचे सर्टिफिकेट व्यावसायिकांना वाटण्याची चळवळ सुरू करण्यात आली.
धार्मिक द्वेष पसरवणारे कारस्थान
कायदा हातात घेऊन, व्यावसायिकांच्या व्यवसाय स्वातंत्र्यावर गदा आणणारे आणि समाजात धार्मिक द्वेष, संशय पसरवणारे हे कारस्थान आहे. म्हणून धर्माच्या नावाने कायदा हातात घेणाऱ्या अशा संघटनांच्या जाहीर कार्यक्रमांची वेळीच दखल घेऊन त्यांना कायदेशीर कडक समज देणे, कायद्याच्या कचाट्यात आणणे आवश्यक आहे, असे महाराष्ट्र अंनिसचे राज्य अध्यक्ष अविनाश पाटील व राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
आणखी वाचा