Manikrao Kokate : हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? कृषीमंत्री कोकाटेंचं वक्तव्य
Agriculture Minister Manikrao Kokate : नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेले होते.

Agriculture Minister Manikrao Kokate : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. “हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का?” असे वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असताना कोकाटे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.
अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेले होते.
नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
यावेळी पत्रकारांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी पत्रकारांनी नुकसानीच्या संदर्भात विचारले असता नुकसानीचे पंचनामे सुरू असल्याची माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली. तर शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहेत, असे विचारले असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. त्याचे पंचनामे करणे अवघड आहे. ते नियमात बसत नाही, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, शेतात जी काही पिके असतील त्यांचे रीतसर पंचनामे केले जातील असेदेखील माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले.
कोकाटेंच्या वक्तव्याने नवा वाद?
दरम्यान, मागील आठवडाभरात महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. कांदा, आंबा, भुईमूगाच्या शेंगा यांसारख्या महत्त्वाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची घोषणा केली करण्यात आली आहे. मात्र, आता कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकाटे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांना ‘भिकारी’ म्हणत, तसेच कर्जमाफीची रक्कम लग्नासाठी खर्च केली जाते, असे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला होता. आता कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर विरोधक काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा























