Nashik News : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आज प्रहार संघटनेतर्फे नाशिक–संभाजीनगर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल एक तासाहून अधिक काळ हे आंदोलन सुरू राहिल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कांद्याला हमीभाव, तातडीचे अनुदान आणि दरवाढ या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने (Nashik News) रस्त्यावर उतरले. आंदोलनकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या (Onion Price Issue) माळा घालून आणि डोक्यावर काळी पट्टी बांधून केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला. मोदी साहेब कांद्याला भाव द्या, नाहीतर इच्छा मरण करण्याची परवानगी द्या, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या प्रतिमेला कांद्याचा माळा घालण्यात आल्या. मागण्या तातडीने मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. असा इशाराही प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आला.

Continues below advertisement


नाफेडच्या कांद्याची वाहतूक करणारे ट्रक पेटवून देण्याचा इशारा


दुसरीकडे, नाफेडचा कांदा बाजारात घेऊन जाणारे ट्रक शेतकऱ्यांनी अडवले आहेत. काल रात्री (19 सप्टेंबर ) देवळा, उमराणे परिसरात हे कांद्याचे ट्रक अडविले आहेत. रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शरद जोशी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कांद्याचे ट्रक अडविले आहेत. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव नसताना नाफेड नव्याने खरेदी केलेला कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विक्री न करण्याची आंदोलकांची मागणी आहे. अन्यथा यापुढे नाफेडच्या कांद्याची वाहतूक करणारे ट्रक पेटवून देण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संघटना आता अधिक आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.


मनमाड रेल्वे स्टेशन परिसरात वनविभागाची मोठी कारवाई; हरिणाच्या कातडीसह 4 जणांना अट


मनमाड रेल्वे स्टेशन परिसरात वनविभागाने केलेल्या कारवाईत हरिणाच्या कातडीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग, मुंबईकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. अटक झालेल्या आरोपींची नावे दीपक सुरेश चव्हाण, प्रभू रामेश बनसोडे, मारोती लक्ष्मण उईके आणि अभिलाष अर्जुन पाटील अशी आहेत. भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत या चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वनविभाग पुढील तपास करीत आहे.


आणखी वाचा