Nanded News :नांदेडमधून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. शहरातील नगीना घाट परिसरात गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शहरातील साठे चौक परिसरातील तीन मुले आज संध्याकाळच्या सुमारास नगीना घाट येथे पोहण्यासाठी गेली होती. मात्र, नदीच्या पात्रात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही मुले पाण्यात बुडाली. 

या घटनेमुळे साठे चौक परिसरात हळहळ

या अपघातात रणवीर यशवंत शिंगाडे (वय 14 वर्षे) आणि गणेश डोंगरे (वय 13 वर्षे) या दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे साठे चौक परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

देवगडच्या मिठमुंबरी समुद्रात पर्यटनासाठी आलेले चौघे पर्यटक बुडाले, तिघांना वाचण्यात यश, एक बेपत्ता

देवगड तालुक्यातील मिठमुंबरी समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक समुद्रात बुडाले आहेत. यात तिघांना वाचण्यात यश आले आहे. तर एक पर्यटक समुद्राच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना आज संध्याकाळी उशिरा घडली आहे. या घटनेत स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे तिघा पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, अद्यापही एक पर्यटक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. चैतन्य राजेंद्र गुरव, दादर-नायगाव इथला बेपत्ता पर्यटकाचे नाव आहे. तर सोहम जयेश मंडोद या पर्यकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला देवगडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ समुद्रकिनारी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य वेगाने राबविण्यात आले.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! कालपासून बेपत्ता असणाऱ्या मुलांचा दुर्दैवी अंत, अमरावतीत तीन सख्ख्या भावंडांचा धरणात बुडून मृत्यू