नांदेड : यापुढे कोणत्याही निवडणुकीत खासदार प्रतापराव चिखलीकर (Prataprao Chikhalikar) यांना गुलाल लागू देणार नसल्याची प्रतिज्ञा लोहाचे आमदार श्यामसुंदर शिंदे (Shyamsundar Shinde) यांनी केली आहे. लोहा बाजार समिती निवडणुकीत दाजीने मेहुण्याला चितपट केलं आणि एकच राजकीय चर्चा रंगली. त्यानंतर आमदार शिंदे यांनी खासदार चिखलीकरांवर सडकून टीका केली. यावेळी आमदार शिंदे यांनी पहिलवानासारखे दंड थोपटून मतदारसंघाचा सातबारा हा कुणाच्या एकाच्या नावे नसून मतदार ठरवतील त्यांचा विजय होईल असा इशारा दिला. त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी 18 पैकी 16 जागा मिळवत विरोधी चिखलीकर गटाचा धुव्वा उडवला. त्यामुळे आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. त्याच आत्मविश्वासात त्यांनी त्यांचे मेहुणे  खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. यापुढील कोणत्याच निवडणुकीत चिखलीकरांना गुलाल लागू देणार नाही असं आव्हानही त्यांनी दिलं. त्यामुळे येत्या काळात दाजी आणि मेहुण्याच्या राजकीय संघर्षाला धार येणार असल्याची चिन्हं आहेत. 


मागील विधानसभा निवडणुकीत लोहा-कंधार मतदारसंघातील तिकिटावरून दाजी आणि मेहुण्यात बिनसले. त्यानंतरच्या काळात हे संबंध प्रचंड ताणले गेले. त्यातून दोघांनीही एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी सोडली नाही. दरम्यान, बाजार समितीसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार शिंदे गटाने चिखलीकर गटाचा धुव्वा उडवत विजय मिळवला. आमदार शिंदे यांच्या समर्थकांनी विजयानंतर शहरात मिरवणूक काढली.